एका महिलेने सुरक्षा रक्षकाची गैरवर्तन करत त्याला लाथ मारल्याचा प्रकार समोर आला आहे. तसंच या सुरक्षा रक्षकाला तिने शिवीगाळ केली असाही आरोप आहे. ही घटना ग्रेटर नोएडातील सेंच्युरियन पार्क टेरेस होम्स या ठिकाणी घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

नोएडातील अम्रपाली सेंच्युरियन पार्क टेरेस होम्स या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या महिलेने ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवले होते. जो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह सोसायटीच्या गेटवरर आला तिथे सुरक्षा रक्षकाने त्याला पडताळणीसाठी थांबवलं. ज्यानंतर या महिलेचा राग अनावर झाला. तिने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली असा आरोप आहे. तसंच या महिलेने त्याच्या दिशेने लाथही उगारली आणि त्याला, मी तुझ्याकडून बूट साफ करुन घेईन असं म्हणत तुझी माझ्यासमोर काय औकाद आहे असा प्रश्न विचारला. ज्यानंतर या सुरक्षा रक्षकाने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. एवढंच नाही तुला कुणाला बोलवायचं त्यांना बोलव, पोलिसांना बोलवायचं तरी बोलव पोलीस माझ्यावर कारवाई करु शकणार नाहीत असंही म्हटलं आहे. सुरक्षा रक्षकाच्या आर्थिक परिस्थितीवरुनही तिने त्याला सुनावलं. गरीब के पिल्ले तेरे पास दो रोटी भी नहीं.. असंही या महिलेनेया सुरक्षा रक्षकाला सुनावलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांचं या व्हिडीओबाबत काय म्हणणं आहे?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की हे नेक्स्ट लेव्हलची नारी शक्ती आहे. पण त्या सुरक्षा रक्षकाला गरीब के पिल्ले वगैरे म्हणायची आवश्यकता नव्हती. बहुदा या मॅडम स्त्रीवादी असाव्यात त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर समानता, स्त्रीवाद या सगळ्या गोष्टीच असाव्यात म्हणून त्यांनी हे वर्तन केलं असावं असा टोला लगावला आहे. आणखी एका युजरने म्हटलं आहे ही आहे खरी वुमन एम्पॉवरमेंट पुढे त्याने स्मायली पोस्ट करत या व्हिडीओची खिल्ली उडवली आहे. तो म्हणतो ऑर्डर घेऊन आलेला माणूस इतका घाबरला आहे की ती महिला चारदा सांगते आहे तरीही तो तिला आणलेला पदार्थ देऊ शकलेला नाही. आणखी काही युजर्स म्हणाले की एखादा पुरुष जर महिला सुरक्षा रक्षकाशी असं वागला असता तर थेट विनयभंगाची वगैरे तक्रार झाली असती. पुरुषांच्या विनयाचं काय त्याची काही किंमत आहे की नाही? अजून एक युजर म्हणतो या महिलेच्या बऱ्याच ओळखी असू शकतात त्यामुळे ती म्हणते आहे की तिच्यावर कारवाई होणार नाही. अशा प्रकारे घटना घडणं दुर्दैवी आहे.