Uttar Pradesh Crime Viral Video : देशभरात दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येतात. काही घटना संपत्तीच्या वादातून तर काही घटना कुटुंबातील वादातून घडतात. आता अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. अवैध संबंधात अडथळा ठरत असल्याने सुनेने प्रियकराला हाताशी धरून सासऱ्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या प्रियकराला हाताशी धरून सासऱ्याची हत्या केली. हत्या करताना सासऱ्याचा गळा चिरला आणि मोबाईलवर हत्येच्या घटनेचं चित्रीकरण करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, “१ फेब्रुवारीच्या रात्री सराय लखानसी परिसरात सुबच्चन नामक व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा गुन्हा उघडकीस आला. या घटनेतील आरोपींमध्ये पीडित व्यक्तीची सून पिंकी आणि तिचा प्रियकर राममिलन आणि त्याचे दोन सहकारी सुधीर व रोहित यांचा समावेश आहे. या हत्येच्या प्रकरणी या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.”

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार सुबच्चन यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एका आंब्याच्या बागेत गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि हत्येचा तपास करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती.

या घटनेच्या तपासाच्या दरम्यान अधिकाऱ्यांना असं आढळून आलं की, राममिलन हा पिंकीचा प्रियकर होता आणि तिचा पती हा परदेशात काम करत होता, तो जवळजवळ दोन वर्षांपासून तो घरी परतला नव्हता. त्यामुळे पिंकीच्या प्रेमसंबंधाबद्दल सासऱ्याला समजल्याने कुटुंबात वारंवार वाद होत होता.

मऊ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुप कुमार यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, “चौकशी, संशय आणि खबऱ्यांच्या माहितीवरून प्राथमिक तपासात असं आढळून आलं की पिंकीने तिच्या प्रियकरासह मिळून हा कट रचला होता.” पोलिसांनी सांगितलं की, पिंकीने तिच्या प्रियकराला सांगितलं होतं की तिचे सासरे तिच्याशी गैरवर्तन करत आहेत आणि त्यानंतर तिच्या प्रियकराने आपल्या दोन मित्राच्या मदतीने दारू पिण्याच्या बहाण्याने तिच्या सासऱ्याला बोलावलं आणि हत्या केली. आरोपींनी हत्या करताना मोबाईल फोनवर व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. पोलिसांनी आता मोबाईल फोनसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त केली आहे.