एक महिला आणि तिच्या तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडले आहेत. दिल्लीतल्या समयपूर बडली भागातली ही घना आहे. या प्रकरणात महिलेच्या पतीचा हात असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस तपासही करत आहेत. ही घटना चंदन पार्क भागात घडली आहे.

चंदन पार्क भागात काय घडलं?

चंदन पार्क भागातल्या एका सोसायटीत एका घरात तीन लहान मुलांच्या मृतदेहांसह एका महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. चारही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या महिलेच्या पतीनेच पत्नीचा गळा चिरला आणि मुलांनाही ठार केलं असं पोलिसांना वाटतं आहे. त्यानंतर हा इसम तिथून फरार झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तसंच या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येणार असून त्याचा अहवाल येण्याची आम्ही वाट पाहात आहोत असंही पोलिसांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सदर प्रकरणातील मृतांची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत

या प्रकरणी पोलिसांनी जास्त माहिती दिलेली नाही. सदर महिलेचं नाव काय होतं आणि तिच्या मुलांची नावं काय होती हे देखील तूर्तास सांगितलेलं नाही. मात्र पोलीस महिलेच्या फरार पतीचा शोध घेत आहेत. त्यासाठी विविध तपास पथकंही तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणात काही हाती लागतं आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. सदर माणसाने त्याचं कुटुंब का संपवलं? त्यांच्यात काही वाद सुरु होते का? इतकं टोकाचं पाऊल उचलण्याइतकं काय घडलं? पती-पत्नी दोघांमध्ये भांडणं होत होती का? या सगळ्या पैलूंच्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. सदर फरार इसम सापडल्यानंतरच या प्रकरणातील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार आहेत. पोलिसांनी या इसमाला शोधण्यासाठी तपास पथकं आणि साध्या वेशातले पोलीसही तैनात केले आहेत.