महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह रिल करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने ५०० रुपयांची नोट दाखवत त्यावरचा महात्मा गांधींच्या फोटोबाबत आक्षेपार्ह रिल तयार केलं. सिमरन असं या कंटेट क्रिएटर महिलेचं नाव आहे. ही घटना गुजरातच्या सुरतमधली असून समाजसेवकाच्या तक्रारीनंतर सिमरन या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेचे इन्स्टाग्रामवर १० लाख फॉलोअर्स आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सुरत पोलिसांनी सिमरन नावाच्या कंटेट क्रिएटरला अटक केली आहे. १ ऑक्टोबर रोजी या महिलेने दुपारी १ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान एक व्हिडीओ पोस्ट केला होता. २ ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती असते. त्याआधीच या महिलेने हा व्हिडीओ पोस्ट केला होता जो आक्षेपार्ह होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका समाजसेवकाने सुरत पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली. ज्यानंतर या सिमरन या ४७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने महात्मा गांधींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर ५०० रुपयांची एक नोट दाखवली. ती ठेवताना तिने आक्षेपार्ह वर्तन केलं. व्हिडीओचा तेवढा भाग ब्लर करून पोलिसांनी Before आणि After असे या महिलेचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडीओत ही महिला महात्मा गांधींची खिल्ली उडवताना दिसते आहे. दुसऱ्या व्हिडीओत तिला अटक करण्यात आल्याचं दिसून येतं आहे. सुरत पोलिसांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रिल काय आहे आणि वास्तव काय आहे ते पोलिसांनी या व्हिडीओत पोस्ट केलं आहे.

समाजसेवक धर्मेश गामी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिमरन या कंटेट क्रिएटरला अटक करण्यात आली. त्यानंतर ती वादग्रस्त रिलबाबत माफी मागत असल्याचा आणि दिलगिरी व्यक्त करत असल्याचा व्हिडीओही सुरत पोलिसांनी पोस्ट केला आहे. धर्मेश गामी हे समाज सेवक आहेत. त्यांच्यापर्यंत जेव्हा हा व्हायरल व्हिडीओ पोहचला तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. ज्यानंतर सिमरन या कंटेट क्रिएटरला पोलिसांनी अटक केली. सिमरन या कंटेट क्रिएटरवर IT अॅक्टच्या कलम ६७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांचं आवाहन काय?

या प्रकरणानंतर पोलिसांनी रिल करणाऱ्या सगळ्यांनाच हे आवाहन केलं आहे अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करू नका. तसंच सिमरन पटेल यांच्याबाबतही पोलिसांनी माहिती दिली. सिमरन पटेल या मागच्या १७ वर्षांपासून सुरतमध्ये वास्तव्य करतात. गेल्या काही वर्षांपासून त्या सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. मात्र अशा पद्धतीचं रिल किंवा व्हिडीओ कराल तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागेल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.