प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार; चार जणांना अटक

धक्कादायक म्हणजे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले.

rape
(प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच राजधानी दिल्लीत महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पीडित महिला आणि आरोपींमध्ये वैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाले असून तिला एक मूल आहे. मध्यंतरी अनेक महिने तिच्या शेजारी राहणारा एक तरुण तिचा पाठलाग करत होता. तो नंतर नोव्हेंबरमध्ये आत्महत्या करून मरण पावला. त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या आत्महत्येसाठी महिलेला जबाबदार धरले होते. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “वैयक्तिक वैमनस्यातून एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना शाहदरा जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आणि चौकशी सुरू आहे. पीडितेला सर्व शक्य मदत आणि समुपदेशन केले जात आहे.”

दरम्यान, या घटनेची माहिती महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

महिला आयोगाने घेतली घटनेची दखल…

दिल्ली महिला आयोगाने (DCW) या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोग दिल्ली पोलिसांना याप्रकरणी नोटीस देखील जारी करेल. अवैध दारू विक्रेत्यांनी महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे आयोग प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman assaulted kidnapped and gang raped in delhi on republic day hrc

Next Story
५० कॅरेटच्या एका Blue Diamond मुळे ३० वर्षांपासून या दोन देशांमध्ये होतं वैर; आता मात्र…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी