Gurugram Female Biker Accident Video: गुरुग्राममधील गोल्फ कोर्स मार्गावर हिट अँड रनचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला दुचाकीस्वाराचा पाठलाग करून तिच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पळ काढल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून ती थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर धडक देणाऱ्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी महिलेचे नाव सिया असून तिने सोशल मीडियावर या घटनेसंदर्भातील व्हिडीओ शेअर करत मदतीची मागणी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
सिया नामक महिला इतर दुचाकीस्वारांबरोबर रविवारी बाईकिंगचा आनंद घेण्यासाठी निघाली होती. तिच्याकडे आरएस ४५७ ही दुचाकी होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हरियाणाचा नोंदणी क्रमांक असलेली कार या महिलेचा दुचाकीचा पाठलाग करताना दिसते. त्यानंतर अचानक कार वेग घेत सियाच्या दुचाकीला धडक देताना दिसते. ही धडक जाणूनबुजून दिल्याचे व्हिडीओतून दिसत आहे.
सियाने दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना ही कार त्यांचा पाठलाग करत होती. त्यामुळे तिने कार चालकाला सुरक्षित अंतर राखण्यास सांगितले. यावर कारमधील चालक संतापला आणि तिला दुचाकी बाजूला थांबवण्यास सांगू लागला. कारमध्ये चालकासह इतरही लोक होते. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत होते, असा आरोप सियाने केला आहे.
? WOMAN RIDER SHARES GURUGRAM HIT-AND-RUN VIDEO
— contentkikamii (@contentkikamii) September 14, 2026
A woman rider has shared a video alleging that a car driver repeatedly tried to approach and cut her off while she was riding with friends on Golf Course Road in Gurugram on Sunday.
According to her account, the driver allegedly… pic.twitter.com/8x17bfis4l
आम्ही त्यांचा पिच्छा सोडवण्यासाठी पुढे जात राहिलो. माझा एक मित्र त्याच्या बाईकवरून मला सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तरीही त्या कारने पाठलाग करून माझ्या दुचाकीला जोरदार धडक दिली, असेही सियाने सांगितले. सदर धडक बसल्यानंतर सिया दुचाकीवरून खाली पडली आणि तिची दुचाकी काही अंतरावर फरफटत गेल्याचे व्हिडीओत दिसले. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी फरफटत जात असताना ठिणग्या उडाल्याचेही दिसले.

या धडकेनंतर सियाच्या मित्राने कारचालकाचा पाठलाग करत त्याला पुढच्या सिग्नलवर गाठले. मात्र कार चालकाने धडक दिल्याचे नाकारून सिग्नल मोकळा होताच तिथून पळ काढला. सियाने राइडिंगसाठी वापरले जाणारे संरक्षक गियर घातल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली नसल्याचे इतर दुचाकीस्वारांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. गुरुग्रामच्या रस्त्यांवर महिला दिवसाढवळ्याही सुरक्षित नाहीत, असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे.
