७० वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. तिच्या पतीला याबाबत कल्पनाही आली नाही. कारण या महिलेचे पती मागच्या १५ वर्षांपासून पक्षाघात (Paralysis) या आजाराने त्रस्त आहे. पोलिसांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा ते देखील हेलावले. बंगळुरु मध्ये ही घटना घडली आहे. ७० वर्षीय महिलेचा पती पक्षाघातामुळे आणि मानसिक आजारामुळे त्रस्त होते. त्यांच्यासमोर ही हत्या करण्यात आली. पण त्यांना याबाबत काहीही कळलं नाही.
नेमकी काय घटना घडली?
बंगळुरुतल्या हिरापूर मधली ही घटना आहे. ७० वर्षीय शोभा या त्यांचे पती रंगनाथ यांच्यासह राहात होत्या. रंगनाथ हे मागच्या १५ वर्षांपासून अंथरुणाला खिळून होते. त्यांना पक्षाघात आणि मानसिक आजार जडला होता. या दोघांना मुलगा किंवा मुलगी नाही. नवऱ्याला फिरायला घेऊन जाऊन आल्यानंतर शोभा त्यांच्या घरात होत्या. रंगनाथ यांना फिजिओथेरेपी सुरु होती. या थेरेपीसाठी जेव्हा डॉक्टर त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की शोभा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रंगनाथ यांना काय घडलं आहे ते कळलंही नाही. या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलं. समोर असलेलं दृश्य पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना समजलं की शिवकुमार नावाच्या एका दुकानदाराने हे कृत्य केलं आहे.
शिवकुमार कोण आहे त्याने वृद्धेची हत्या का केली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकुमार नावाच्या एका दुकानदाराने शोभा या ७० वर्षीय महिलेची हत्या केली. शिवकुमारवर ८ लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. त्यातून सुटण्यासाठी लुटीच्या उद्देशाने शिवकुमारने शोभा यांची त्यांच्या पतीसमोर हत्या केली. आरोपी शिवकुमार रात्री १ च्या सुमारास शोभा यांच्या घरात आला. त्याने रंगनाथ यांच्यासमोरच शोभा यांचा गळा चिरला आणि त्यांची हत्या केली. शोभा यांच्या अंगावर असलेलं मंगळसूत्र, बांगड्या आणि इतर दागिने त्याने लुटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकुमारने ४५० ग्रॅम सोनं लुटलं ज्याची बाजारातली किंमत ६५ लाख रुपये आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
शिवकुमार सगळा तमाशा बघत उभा होता
पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला हे सगळं काही शिवकुमार तिथे उभं राहून पाहात होता. आपल्यावर कुणाला संशय येऊ नये हा त्याचा उद्देश होता. काय घडलंय हे बघायला जे लोक जमले होते त्यामध्ये शिवकुमारही होता. त्यानंतर तो अॅक्टिव्हा घेऊन घटनास्थळावरुन शांतपणे निघून गेला. सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि पोलिसांना लक्षात आलं की शिवकुमारच यातला संशियत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
