महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून एका वृद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्या वृद्धाच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने पळवले. राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण चार जणांना अटक केली आहे. यामध्ये सिमरन नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. सिमरन आणि तिच्या बॉयफ्रेंडने खन्ना आडनाव असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला लुटलं आणि त्याची गळा दाबून हत्या केली. दरोडा आणि हत्या प्रकरणात सिमरन आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे.

नेमकी काय घटना घडली?

६० वर्षीय वृद्धाचं नाव राकेश खन्ना असं होतं. खन्ना हे दिल्लीतल्या रोहिणी सेक्टर ३ मध्ये वास्तव्य करत होते. सिमरन ही त्यांची नातेवाईकच होती. राकेश खन्ना यांनी त्यांचा एक फ्लॅट विकला होता ज्याचे पैसे त्यांना मिळाले होते. सिमरनला ही गोष्ट माहीत होती. त्यानंतर सिमरनने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून राकेश खन्नांच्या हत्येचा कट रचला. सिमरनकडे खन्ना यांच्या घराची दुसरी चावी होती. या चावीचा वापर करुनच सिमरन आणि तिचा बॉयफ्रेंड घरात शिरले. त्यावेळी राकेश खन्ना यांची पत्नी बाजारात गेली होती. घरात शिरल्यानंतर दोघांनी राकेश खन्ना यांची गळा आवळून हत्या केली आणि घरातून पैसे तसंच दागिने घेऊन पळ काढला अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

पोलीस उपायुक्त शशांक जयस्वाल काय म्हणाले?

पोलीस उपायुक्त शशांक जयस्वाल म्हणाले आम्हाला साधारण संध्याकाळी ७.३० च्या सुमारास फोन आला. एका फ्लॅटमध्ये एक माणूस शुद्ध हरपलेल्या अवस्थेत पडला होता, त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही त्या घरी गेलो. घर लुटलं होतं हे दिसत होतं. राकेश खन्ना यांना जेव्हा रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आरोपी आणि राकेश खन्ना यांची ओळख आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने सूत्रं हलवली आणि सिमरनसह तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. कारण पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज सापडलं होतं. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या अडीच तासांत काय घडलं होतं त्याचा छडा लावला आणि सिमरनसह एकूण चार जणांना अटक केली. या प्रकरणी आम्ही पुढील तपास सुरु केला आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं.