बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये ते एका महिलेचा हिजाब खेचताना दिसत होते. त्यांच्या या कृतीनंतर राजदने आणि काँग्रेसने त्यांचा राजीनामा मागितला होता. मात्र केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी त्या महिलेने नरकात जावं असं वक्तव्य केलं आहे.

गिरीराज सिंह काय म्हणाले?

गिरीराज सिंह म्हणाले नितीश कुमार यांची काहीही चूक नाही. जर कुणी स्वतःचं नियुक्ती पत्र घ्यायला जात असेल तर त्या व्यक्तीने स्वतःचं तोंड दाखवण्यात काय चूक आहे? आपला देश हा काय इस्लामिक देश आहे का? नितीश कुमार यांनी केलेली कृती ही एखाद्या पालकाने किंवा वडिलधाऱ्या माणसाप्रमाणे केलेली कृती होती. तुम्ही जर पासपोर्ट घ्यायला गेलात, विमातळावर गेलात तर तुम्ही तिथे तुमचा चेहरा दाखवणार नाही का? नितीश कुमार यांनी काहीही चुकीचं वर्तन केलेलं नाही.

त्या महिलेने नरकात जावं- गिरीराज सिंह

जेव्हा गिरीराज सिंह यांना पत्रकारांनी विचारलं की ज्या महिलेचा हिजाब खेचण्यात आल तिने आता ती नोकरी करण्यास नकार दिला आहे. त्यावर गिरीराज सिंह म्हणाले, तिने नोकरी घेण्यास नकार द्यावा किंवा नरकात जावं. गिरीराज सिंह यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

हिजाब खेचण्याचं प्रकरण नेमकं काय?

लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाने म्हणजेच आरजेडीने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये, हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब बाजूला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसून येतात. नितीश कुमारांना हे काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे, किंवा नितीश बाबू १०० टक्के संघी बनले आहेत, अशी बोचरी टीका राजद पक्षाने केली आहे. तर, काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरुन संताप व्यक्त करत, हे कृत्य माफी योग्य नाही असे म्हटलं आहे.

काँग्रेसनेही केली टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा निर्लज्जपणा बघा, जेव्हा एक महिला डॉक्टर आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी आली तेव्हा नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरुन हिजाब खेचला. बिहारच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे असे नीच कृत्य केलं आहे. विचार करा, राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. नितीश कुमारांनी या कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, हे माफीलायक नाही, असेही काँग्रेसने म्हटलं आहे.