एका महिलेने तिच्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसह मोमोज खाताना पकडलं. ज्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीचं डोकं कारच्या बॉनेटवर आदळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीला अटक केली आहे. आपण जाणून घेऊ नेमकं काय घडलं.
नेमकी काय घटना घडली?
मयांक आणि सुनीता या दोघांचं लग्न झालं आहे. मात्र मयांकचं अफेअर सुरू आहे असा संशय त्याच्या पत्नीला होता. ज्यानंतर पत्नी सुनीताने त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरूवात केली. शनिवारी मयांक त्याच्या गर्लफ्रेंडसह म्हणजेच माही नावाच्या एका महिलेसह मोमोज खात होता. तेवढ्यात सुनीता तिथे आली आणि तिने या दोघांनाही रंगेहाथ पकडलं. सुनीताने या दोघांना जाब विचारला. ज्यानंतर मयांकने माहीला बरोबर घेतलं आणि तो कारने पळून जायचा प्रयत्न करत होता. ज्यानंतर सुनीता कारच्या काचांवर हात मारत होती. पण मयांक थांबला नाही. त्यानंतर तिने कारच्या बोनेटवर पडून घेतलं. तरीही मयांकने कार सुरू ठेवली. ज्यामुळे सुनीताचं डोकं बोनेटवर आदळलं. तेव्हा सुनीता मदतीसाठी ओरडत होती. त्याने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली. एनटीडीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी या घटनेनंतर मयांकला केली अटक
पोलिसांनी या घटनेनंतर मयांकला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संग्राम सिंग यांनी ही माहिती दिली. मयांक नावाच्या या इसमाने त्याच्या पत्नीच्या अंगावर गाडी घालून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची आम्ही दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणात आम्ही मयांकविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहितीही संग्राम सिंग यांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मयांक आणि त्याची गर्लफ्रेंड माही या दोघांनाही अटक केली आहे. तसंच टाटा क्रूझर नावाची कार जप्त केली आहे. या कारचा नंबर UP 15 ER 3086 असा आहे. अशीही माहिती पोलिसांनी दिली तसंच या प्रकरणी आम्ही पुढील तपास करत आहोत असंही संग्राम सिंग यांनी स्पष्ट केलं.
मयांक जेव्हा कार चालवू लागला तेव्हा सुनीता जोरात ओरडत होती. साधारण १०० मीटर त्याने तिला फरफटत नेलं असं तिने पोलिसांना सांगितलं. या घटनेत तिला काही जखमाही झाल्या आहेत. मयांक हा प्रकार करत होता तेव्हा त्याला लोकांनी जबरदस्तीने थांबवलं. सुनीताच्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार समोर आला. सुनीताने पोलिसांत जी तक्रार केली त्यात तिने मानसिक आणि शारीरिक छळ, हुंड्यासाठी छळ या तक्रारीही मयांकच्या विरोधात केल्या आहेत.
