सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशाद्वारे शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश खुला केल्यानंतर केरळमधून याला मोठा विरोध होत आहे. दरम्यान, महिला प्रवेशाविरोधात निषेध आंदोलन करताना एका महिलेने मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांच्यावर जातीय टिपण्णी केली होती. त्यानंतर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वादग्रस्त व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने शबरीमाला मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्ड आणि श्री नारायण धर्म परिपलम योगम (एनडीपी) या संस्थेवर टीका केली होती. त्यानंतर या संस्थेच्या प्रतिनिधींनी म्हटले होते की, इवा समाज सत्तेत असल्याने उच्च जातीच्या लोकांना सहन होत नाहीए. एनडीपी ही संघटना इवा समाजाची अग्रणी संघटना आहे. इवा समाज हा केरळमध्ये मागास समाज म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्री पिनरायि यांच्यावर जातीय टिपण्णी करणाऱ्या महिलेचे नाव मनीअम्मा असे असून ती चेरुकोले जिल्ह्याची रहिवाशी आहे.

दरम्यान, त्रावणकोर देवस्वम बोर्डाने केरळ उच्च न्यायालयाला सांगितले होते की, आगामी काळात शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या प्रवेशासाठी ते मर्यादित व्यवस्था करु शकतात.