अमेरिकेच्या ‘रिचमंड टाइम्स डिस्पॅच’ या वृत्तपत्रात ६८ वर्षीय ‘मॅरी अॅने नोलांड’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ छापून आलेला एक श्रद्धांजली संदेश अनेकांच्या भुवया उंचावण्याचे कारण ठरत आहे. नुकतेच फुफ्फुसाच्या कर्करोगाने मरण पावलेल्या या अमेरिकन महिलेबद्दल छापून आलेल्या श्रद्धांजली संदेशात चक्क असे लिहिण्यात आले होते की, ‘जवळ येउन ठाकलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन या दोघांपैकी कोणा एकाला मत देण्याबद्दल द्विधा मनस्थिती निर्माण झाल्यामुळे ही मानसिक कुचंबना टाळण्यासाठी त्यांनी मृत्युला कवटाळले आहे’. जागतिक राजकारणाच्या पटलावरही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीकडे सगळ्यांच्याच नजरा स्थिरावल्या आहेत. निवडणूकीची हीच पार्श्वभूमी पाहता काहीसा विनोदी वाटणारा ‘मॅरी अॅने नोलांड’ बद्दलचा हा श्रद्धांजली संदेश राष्ट्राध्यक्ष पदासाठी अमेरिकेत सुरु असणारी खडाजंगीच दर्शवत आहे.