उत्तर प्रदेशातील लखनऊ या ठिकाणी राहणाऱ्या तरूणीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांची आपबिती सांगितली आहे. २३ सप्टेंबरला या महिलेने तक्रार दाखल केली. तिने पोलिसांना सांगितलं की वयाच्या १६ व्या वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले तसंच तिचा धर्मही बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला इस्लाम धर्म स्वीकार म्हणून दबाव टाकला होता असंही या तरूणीने सांगितलं आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
लखनऊ येथील एका तरूणीने शाहनवाज, सिराज आणि शाहरूख अशी नावं असलेल्या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ही तरूणी २०२१ मध्ये १६ वर्षांची होती, त्यावेळी ती घराच्या बाहेर असताना तिच्या भांगेत बळजबरीने सिंदूर भरण्यात आला आणि तिचे फोटो काढण्यात आले. तू आमचं ऐकलं नाहीस तर तुझा हा फोटो व्हायरल करू असं सांगत माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मागची पाच वर्षे माझं शोषण सुरू आहे असं या तरूणीने सांगितलं आहे. ही पीडिता आता २१ वर्षांची आहे. मी अल्पवयीन होते त्यामुळे मी त्या लोकांच्या दबावाला बळी पडले असंही या तरूणीने पोलिसांना सांगितलं. शहनवाजने तिच्या भांगेत सिंदूर भरला होता. त्यानंतर तो तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध ठेवत होता. असंही या तरूणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं. तसंच ती मागची पाच वर्षे लैंगिक छळ सहन करते आहे असंही सांगितलं. ज्यानंतर पोलिसांनी सदर तरूणीची तक्रार नोंदवून घेतली आहे. या तरूणीने सांगितलं की शहानवाजने तिच्या भांगेत सिंदूर भरून तिचा फोटो काढला. त्यानंतर तो तिच्या घरी आठवड्याभराने गेला होता. त्यावेळी ती तरूणी एकटी होती. हे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि कुठे वाच्यता केलीस तर तुला ठार करेन असं तिला सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
तरूणीने आणखी काय आरोप केले?
या तरूणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिला रोज जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. तसंच मी तुला शुद्ध करेन. तू माझ्याशी लग्न कर. तसंच तुला कलमा पठण करावं लागेल, धर्म बदलावा लागेल असंही शहनवाजने तिला सांगितलं होतं. तो तिला धमक्याही देत होता. तसंच एकदा त्याने काही वेळा कलमा वाचायला लावला तसंच तू हिंदू आहेस हे तू विसर असंही तो तिला म्हणाला होता. एवढंच नाही तर त्याने तिचं धर्मांतर करायचं ठरवलं होतं. तो म्हणाला तुला बुरखा परिधान करावा लागेल. तसंच तू सरस्वती किंवा गणपतीची पूजा करणं सोडून दे. आता इस्लामच स्वीकारायचा आहे हे विसरू नकोस. धर्मांतरासाठी मला त्याच्या भावांनी म्हणजेच शाहरूख आणि सिराज यांनी दबाव टाकला होता. पण मी त्यांना कडाडून विरोध दर्शवला. त्यावेळीही त्या तिघांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली असंही या तरूणीने तक्रारीत म्हटलं आहे. मौलानांना आणून धर्म परिवर्तन कर नाहीतर मरायला तयार राहा असंही तिला धमकावण्यात आलं होतं. तू आमचं ऐकलं नाहीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबालाही गायब करू असंही या तरूणीला सांगितलं गेलं होतं. या तरुणीने पोलिसांना हे सगळं सांगितलं तसंच मी ते घर सोडून पळून आले आहे मला जीव जाईल अशी भीती वाटत होती असंही या तरूणीने सांगितलं आहे.
