दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बॅड हेअरकट केल्याने महिला संतापली होती. तिने हॉटेलविरोधात कोर्टात दावा केला आणि २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. सदर महिलेने सात वर्षे लढा दिला. ज्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हॉटेलला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आशना रॉय असं या महिलेचं नाव आहे. न्यायालयाने या प्रकरणात ITC Maurya या दिल्लीतल्या हॉटेलला सदर महिलेला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

आशना रॉय नावाच्या महिलेने २०१८ मध्ये एक याचिका दाखल केली होती. आशना रॉय ही एक मॉडेल आहे. तिने सांगितलं की आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये तिचा हेअरकट चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. याची भरपाई म्हणून मला २ कोटी रुपये मिळावेत. राष्ट्रीय ग्राहक तंटामुक्त आयोगाकडेही तिने धाव घेतली होती. प्रकरण सात वर्षे चाललं आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की आशना रॉय यांनी जे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत ते पुरेसे नाहीत. फोटो कॉपी पुरावे म्हणून जोण्यात आल्या आहेत त्यामुळे आम्ही त्या ग्राह्य धरणार नाही. इकॉनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

हेअरकटचा वाद न्यायालयात कसा पोहचला?

आशना रॉय ने सुरुवातीला ग्राहक मंचाकडे या संदर्भात तक्रार केली. आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये असलेल्या सलूनमध्ये तिने केस कापले आणि तिचा हेअरकट वाईट झाला म्हणून तिने ही धाव घेतली होती. साधारण वर्षभराने आयोगाने निर्णय दिला की या प्रकरणात आयटीसी हॉटेलची चूक आहे त्यांनी दोन कोटी रुपये भरपाई द्यावी. या प्रकरणानंतर आयटीसी ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात २०२३ मध्ये धाव घेतली. राष्ट्रीय ग्राहक तंटामुक्त आयोगाचा निकालाला आव्हान देण्यात आलं. जो निर्णय आयोगाने दिला आहे तो आम्हाला मान्य नाही. भरपाईची रक्कम खूप जास्त आहे आणि त्यासाठी लागणारे आवश्यक असे पुरावेही आशनाकडे नाहीत असाही दावा करण्यात आला. ज्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात उभं राहिलं. आता सर्वोच्च न्यायालयाने सदर महिलेला २५ लाख रुपये भरपाई द्या असे आदेश आयटीसी मौर्याला दिले आहेत.

दोन कोटींची भरपाई न्यायालयाने का नाकारली?

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय बदलला. जस्टिस राजेश बिंदल आणि जस्टिस मनमोहन यांच्या बेंचने हा निर्णय दिला की आशना रॉय या मॉडेलने एका हेअऱकटमुळे तिचं करिअर उद्ध्वस्त झालं हे म्हटलं होतं. पण तिला हे सिद्ध करता आलेलं नाही. तिच्या वकिलांनी केलेले दावे पोकळ ठरले त्यामुळे भरपाईची रक्कम दोन कोटी रुपये नाही तर २५ लाख रुपये असणार आहे. न्यायालयाने हेदेखील सांगितलं की नुकसान झालं आहे, वाईट हेअरकट आहे हे दाखवण्यासाठी आशना रॉय यांच्या वतीने जे पुरावे सादर केले त्यात काही ई मेल आणि फोटो कॉपी आहेत. कोट्यवधी रुपयांची भरपाई मागत आहेत तर तसे ठोस पुरावे आणा. शिवाय तपासात हे देखील आढळून आलं आहे की जी कागदपत्रं सादर करण्यात आली ती हेअरकटच्या दिवसाच्या आधीची होती. या घटनेशी त्या कागदपत्रांचा काहीच संबंध नव्हता. त्यामुळे भरपाईची रक्कम २५ लाख करण्यात आली.