Woman Dies During Bungee Jump: थरार, साहस आणि अंगावर काटा आणणारा अनुभव म्हणून अनेक जण बंजी जंपिंगसारख्या अॅडव्हेंचर खेळांची निवड करतात. मात्र, अशाच एका थरारक उडीने एका २१ वर्षीय तरुणीचा जीव घेतला आणि काही क्षणांत आनंदाचे वातावरण शोकांतिकेत बदलले.

घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बंजी जंपिंगसाठी सज्ज झालेली दिसते. कर्मचारी तिला पुलाच्या काठावर घेऊन जातात. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे दिसत असतानाच अचानक असा प्रकार घडतो की, उपस्थितांच्या पायांखालची जमीनच सरकते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला उडी मारण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, सर्वांत महत्त्वाचा असलेला सुरक्षा दोरच तिच्या शरीराला जोडण्यात आला नव्हता. ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही आणि काही क्षणांतच तिला पुलावरून खाली सोडण्यात आले.

तरुणी खाली झेपावताच आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना काहीतरी चूक झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

प्रत्यक्षदर्शी मोठ्याने ओरडू लागले. काही जणांनी सुरक्षा दोराबद्दल इशारा देण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काही सेकंदांच्या निष्काळजीपणामुळे तरुणी खोल दरीत कोसळली.

घटनेनंतर तातडीने बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तरुणीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

या घटनेमुळे साहसी खेळांमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंजी जंपिंग, पॅराग्लायडिंग, स्कायडायव्हिंग किंवा इतर कोणत्याही अॅडव्हेंचर उपक्रमात सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे किती आवश्यक आहे, याची ही घटना धक्कादायक आठवण करून देते.

दरम्यान, या दुर्घटनेपूर्वी तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्टही केली होती. पुलाजवळील छायाचित्र शेअर करत तिने गमतीने लिहिले होते की, मला पुलावरून उडी मारायला कोणी परवानगी दिली असेल? दुर्घटनेनंतर ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या वेळी तिचा होणारा पतीदेखील घटनास्थळी उपस्थित होता. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची प्रकृतीही बिघडल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीनंतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाला का आणि या दुर्घटनेस नेमके कोण जबाबदार आहे, याचा तपास सुरू आहे.

येथे पाहा व्हिडीओ

ही हृदयद्रावक घटना भारतातील नसून, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशात घडली आहे. तेथील साओ पावलो राज्यातील एका पुलावर आयोजित करण्यात आलेल्या बंजी जंपिंग उपक्रमादरम्यान हा भीषण प्रकार घडला. या दुर्घटनेत मारिया एडुआर्डा रोड्रिग्स डी फ्रेटास या २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.