ब्रिटिश एअरवेजच्या हाँगकाँगहून लंडनला निघालेल्या विमानात तासाभरातच एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. क्रू मेंबर्सनी विमान मागे न फिरवता प्रवास सुरुच ठेवला. त्यामुळे विमानातील प्रवाशांना १३ तास मृतदेहासह प्रवास करावा लागला. तसंच कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह अशा ठिकाणी ठेवला जिथे तापमान जास्त होतं. त्यामुळे काही वेळातच विमानात दुर्गंधी पसरली.
नेमकी घटना काय घडली?
हाँगकाँगहून विमानाने उड्डाण केलं आणि एक तासाच्या आतच महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. त्यानंतर क्रू मेंबर्स आणि पायलटने विमान न वळवता किंवा विमानाचं तातडीचं लँडिंग न करता प्रवास सुरु ठेवला. त्यानंतर क्रू मेंबर्सनी महिलेचा मृतदेह प्रवाशांपासून दूर ठेवण्यासाठी सुरुवातीला स्वच्छतागृहात मृतदेह ठेवण्याचा उपाय सुचवला मात्र प्रवाशांनी तो नाकारला. त्यामुळे मृतदेह विमानाच्या रिअर गॅलरीत ठेवला. त्या ठिकाणी तापमान जास्त असल्याने मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे प्रवासी १३ तास हैराण झाले. याच परिस्थितीत प्रवास करावा लागल्याने प्रवाशांच्या नाकी नऊ आले.
ब्रिटिश एअरवेजच्या प्रवक्त्याने काय सांगितलं?
आमच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत आम्ही प्रोटोकॉलनुसार काम करतो. प्रवाशांच्या सोयीसाठी कर्मचाऱ्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेच्या कुटुंबासह आमची सहानुभुती आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती ६० वर्षांची होती. वैमानिकाने महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर लंडनला ते विमान नेलं. त्याचं इमर्जन्सी लँडिंग केलं नाही. ज्यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरुन १२ तास प्रवास करावा लागला.
महिलेचा मृत्यू झाल्यानंतर क्रू मेंबर्सनी काय केलं?
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार क्रू मेंबर्सनी सुरुवातीला हा मृतदेह स्वच्छतागृहात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला प्रवाशांनी विरोध दर्शवला.
यानंतर क्रू मेंबर्सनी हा मृतदेह एका जाड चादरीत गुंडळाला आणि गॅलीमध्ये ठेवला. गॅलीमध्ये विमानाचा असा भाग असतो जिथे फ्लाइट स्टाफचं जेवण ठेवलं जातं आणि सामान ठेवलं जातं.
लंडनमध्ये विमान लँड झाल्यानंतर पोलिसांनी येऊन विमानाची पाहणी केली. त्यावेळी पाहणी पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे ४० मिनिटं प्रवाशांना विमानातच बसावं लागलं.
ब्रिटिश एअरवेज सांगितलं की जे घडलं त्याबाबत आम्ही दिलगीर आहोत, आम्ही नियमांचं पालन करुन सगळी प्रक्रिया केली आहे. जी महिला प्रवासी मृत झाली तिच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
