प्रेमविवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांत एका विवाहितेने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात तिच्या नवऱ्यावर हा आरोप आहे की त्याने तिच्या घरातल्या लोकांकडे ३० लाख रुपये रोख आणि SUV मागितली होती. तो यासाठी तिचा छळ करत होता. हा छळ सहन न झाल्याने अखेर या विवाहितेने छतावरुन उडी मारत आयुष्य संपवलं. आकृती असं या विवाहितेचं नाव आहे. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या नवऱ्याला म्हणजेच गौरवला अटक केली आहे. या मुलीने छतावरून उडी घेण्याआधी माहेरी फोन करून हे सांगितलं होतं की सासरचे लोक तिचा जीव घेऊ इच्छितात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकी काय घटना घडली?
गौरव आणि आकृती यांचा प्रेमविवाह २३ मार्च २०२६ ला झाला होता. गाझियाबाद या ठिकाणी या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यावेळीच गौरवने आकृतीच्या कुटुंबाकडे कारची मागणी केली होती असा आरोप आकृतीच्या भावाने केला आहे. तसंच लग्नानंतर गौरवने ३० लाख रुपये हुंडा मागितला होता असाही आरोप आकृतीच्या घरातल्यांनी केला आहे. गौरवला कर्ज फेडण्यासाठी ही रक्कम हवी आहे असं त्याने सांगितलं होतं. गौरव मागचे सहा महिने आकृतीचा पैसे आणि कारच्या मागणीसाठी छळ करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. रोज होणाऱ्या शारिरीक छळाला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर आकृतीने छतावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. तिने तिच्या घरातल्यांना फोन करून हे सांगितलं होतं की सासरचे लोक तिचा जीव घेऊ इच्छितात.
गौरवला पोलिसांनी केली अटक
मुरादनगर पोलिसांनी आकृतीच्या मृत्यूनंतर तिचा नवरा गौरव, सासरे रमेश, सासू सरोज, नणंद नेहा आणि सोनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आकृतीचा नवरा गौरव याला १२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. आकृतीने छतावरुन उडी मारल्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली. सासरच्या मंडळींच्या आणि नवऱ्याच्या छळाला कंटाळून तिने आयुष्य संपवलं. त्याआधी म्हणजेच ७ सप्टेंबरला रात्री साधारण ९ वाजण्याच्या सुमारास आकृतीने माहेरी फोन केला होता आणि हे सांगितलं होतं की गौरव, रमेश, सरोज आणि दोन्ही नणंदा या तिला ठार मारू इच्छितात. पोलिसांनी आकृतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर गौरवची कसून चौकशी केली आहे. त्याने ३० लाख रुपये हुंडा आणि कार मागितल्याची कबुली दिल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.
