एका महिलेने तिच्या पतीला ठार करण्यापूर्वी झोपेच्या १५ ते २० गोळ्या दिल्या, त्यानंतर त्याला ठार केलं आणि त्याचा मृतदेह बाथरुममध्ये पुरला. ही धक्कादायक घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. पती पत्नीचं नातं हे खरंतर जगातलं असं नातं आहे जे विश्वासावर आणि प्रेमावर अवलंबून असतं. मात्र याच नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. एकीकडे सिया गोयलने तिचा होणारा पती केतन अग्रवालची हत्या केल्याची बातमी चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही बातमीही चर्चेत आली आहे.
नेमकी घटना काय घडली, पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुबी शर्मा या महिलेने तिच्या पतीची हत्या केली. तिच्या मृत पतीचं नाव सुरेंद्र शर्मा असं आहे. तिला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली. तिने पोलिसांना जो जबाब दिला त्यात हे सांगितलं की पतीच्या जेवणात झोपेच्या १५ ते २० गोळ्या मिसळल्या होत्या. जेवल्यानंतर काही वेळातच सुरेंद्रला गाढ झोप लागली. त्यानंतर रुबीने तिची हत्या केली. सुरेंद्रचा काहीही पत्ता लागत नव्हता. मागच्या ४५ दिवसांपासून तो सापडत नव्हता. त्यामुळे सुरुवातीला तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र सुरेंद्रचा काही पत्ताच लागला नाही. त्यावेळी पोलिसांनी रुबीची चौकशी करायचं ठरवलं. सुरेंद्रच्या घरातले किंवा शेजारचे लोक जेव्हा सुरेंद्र कुठे आहे हे रुबीला विचारायचे ते ऐकून रूबी एकच उत्तर द्यायची तो बाहेर गेला आहे, लवकरच परत येईल.
२६ मे रोजी काय घडलं?
२६ मेच्या दिवशी रुबी आणि तिचा दीर अनिल या दोघांनाही १८ मे पासून सुरेंद्र बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. जेव्हा पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा अनिलने सुरुवातीला काही म्हटलं नव्हतं पण पोलिसांना नंतर त्याने सांगितलं की रुबीवर त्याला संशय आहे. दुसरीकडे रुबी पोलिसांना हे भासवत होती की तिचा नवरा बेपत्ता झाला आहे आणि त्याला शोधण्यासाठी आपण आपल्या सासरच्या लोकांनाही मदत करत आहोत. रुबी त्यासाठी शेजाऱ्यांच्या समोर रडायची. माझा नवरा कुठे असेल? कसा राहात असेल वगैरे प्रश्न विचारत होती अशी माहितीही पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
रुबीने मृतदेह बाथरुममध्ये पुरला होता
पोलिसांनी नंतर रुबीची चौकशी केली. तेव्हा रुबीने हे सांगितलं की सुरेंद्रला दारु पिण्याचं व्यसन होतं. त्याने दारु पिऊन भरतपूर या ठिकाणी राहणाऱ्या नातेवाईकांशी जोरदार भांडण केलं होतं. ज्यानंतर ते नातेवाईक कायदेशीर कारवाई करतील आणि आपल्याला कोर्टाच्या तसंच पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील अशी भीती रुबीला वाटली होती. त्यानंतर एक दिवस तिने कट रचून सुरेंद्रला संपवलं. त्याचा मृतदेह बाथरुममधे नेला आणि तो तिथेच पुरला. त्यानंतर त्यावर माती टाकली आणि बाथरुम पूर्वी होतं तसंच केलं. त्यानंतर तिने बाथरुमवर टाइल्सही बसवून घेतल्या. बाथरुमला टाइल्स बसवण्याचं काम एका दिवसात पूर्ण झालं. त्यामुळे कुठल्याही कामगाराला रुबीवर संशय आला नाही. तसंच माती मोठ्या प्रमाणावर टाकून मृतदेह पुरला होता त्यामुळे कुणाला त्याचा वासही आला नाही. या घटनेनंतर साधारण ४५ दिवसांनी पोलिसांनी संपूर्ण घटनेचा छडा लावला. या प्रकरणात रुबीला आणखी कुणी मदत केली का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
