लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या महिलेला मासिक पाळी आली ज्यानंतर तिच्या पतीने तिला मारहाण करत तिचा गळा दाबला आणि तू माझा मूड घालवलास असा आरोप तिच्यावर केला. लग्नानंतर हे जोडपं अंदमान-निकोबार या ठिकाणी हनिमूनसाठी गेलं होतं त्यावेळी ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी ही महिला राहते. तिला मधुचंद्राच्या वेळी मासिक पाळी आल्याने तिच्या पतीने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.

नेमकी घटना काय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २०२३ मधली आहे. या प्रकरणी आत्ता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामागचं कारणही पोलिसांनी सांगितलं. दोन्ही कुटुंबामध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न होत होते. हे प्रयत्न आता दोन्ही बाजूंनी होत नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या कुटुंबाने तक्रारीत असंही म्हटलं आहे की आमच्या मुलीला मारहाण केल्याने बहिरेपणा आला.

महिलेने तक्रारीत काय म्हटलं आहे?

तक्रारदार महिलेने असं म्हटलं आहे की तिचा पती निखिल हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने हनिमूनला गेल्यानंतर मला मासिक पाळी आल्याने मारहाण केली. त्याने मला थोबाडीत ठेवून दिल्या. लाथा मारल्या, बुक्के मारले. तसंच माझा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. मी ओरडत होते, जीव वाचवा म्हणत होते तेव्हा हॉटेलचे काही कर्मचारी माझ्या मदतीला धावले आणि त्याने मला वाचवलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हुंडा मागितल्याचा आणि मानसिक छळ केल्याचाही आरोप

या महिलेने असं म्हटलं आहे तिचं आणि निखिलचं लग्न २०२३ च्या मे महिन्यात झालं. आमच्या लग्नाच्या आधी सासरच्या लोकांनी ही अट ठेवली होती की ज्या वस्तू मला देण्यात येतील त्या ब्रांडेड असल्या पाहिजेत. या महिलेने असंही म्हटलं आहे की माझ्या लग्नामध्ये २० लाख रुपये रोख हुंडा देण्यात आला. तसंच कार आणि इतर भेटवस्तूंची किंमत ही साधारण ४० लाख रुपयांच्या घरात होती. या महिलेने असं सांगितलं की लग्नानंतर २ जून २०२३ ला मी माझ्या सासरी राहण्यास गेले. त्यानंतर मला हुंडा कमी दिला म्हणून हिणवलं जायला लागलं होतं. आमच्या लग्नाला एक महिना झाल्यानंतर म्हणजेच साधारण ४ जुलैच्या दरम्यान आम्ही हनिमूनला गेलो होतो. त्यावेळी माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मला मासिक पाळी आली. ही बाब जेव्हा मी निखिलला सांगितली तेव्हा तो खूप संतापला. तुझी पाळी येणार होती तर मला आधी का सांगितलं नाहीस? माझा मूड घालवलास असं म्हणत त्याने मला मारहाण केली असं या महिलेने म्हटलं आहे.

पोलिसांनी नोंदवून घेतली तक्रार

या महिलेने पुढे सांगितलं की, मी घरी आल्यानंतर माझ्या सासूला आणि नणंदेला सगळा प्रकार सांगितला, पण त्यांनी मलाच दोष दिला आणि मला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी माझ्या वडिलांना बोलवून घेतलं आणि मला घरी घेऊन जा असं सांगितलं. तसंच त्यावेळी निखिलनेही माझ्या वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलीला घरी घेऊन जा मला तिची गरज नाही, तिच्याबरोबर राहायचं नाही असेही आऱोप या महिलेने तक्रारीत केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी १५ ऑगस्टला गुन्हा नोंदवून घेतला आहे. तिच्या पती विरोधात आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास सुरु आहे अशी माहिती गोरखपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी दिली.