माणूस बेपत्ता झाल्याची तक्रार, अर्धवट जळालेला मृतदेह आणि मद्याच्या बाटलीवर असलेले क्यूआर कोड यांच्या मदतीने एका गंभीर हत्येचा छडा उत्तर प्रदेश पोलिसांनी लावला आहे. आग्रा या ठिकाणी एक हत्या झाली. त्या घटनेचा शोध पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि सगळी मेहनत पणाला लावून लावला आहे. या घटनेत ज्याचा मृत्यू झाला त्याच्या पत्नीनेच तिच्या प्रियकरासह मिळून पतीचा काटा काढल्याची बाब समोर आली आहे.

नेमकी काय घटना घडली?

१ एप्रिलला आग्रा येथील सईयान भागात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. ज्यामुळे परिसरात एकच भीती पसरली होती. या मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर असलेलं पहिलं आव्हान होतं. कारण सदर मृतदेहाचा चेहरा इतका विद्रुप झाला होता की तो ओळखता येणं कठीण होतं. पण त्याच्या हातावर असलेला टॅटू त्याचं नाव ओळखण्यासाठी उपयोगी पडला. लोकेंद्र असं या पुरुषाचं नाव होतं. लोकेंद्रच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. लोकेंद्रच्या भावापर्यंत पोलीस पोहचले आणि मग घटनेचा उलगडा झाला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांना घटनेचे धागेदोरे कसे सापडले?

उत्तर प्रदेश पोलिसांनी या घटनेचा शोध लावण्यासाठी पाच पथकं तयार केली होती. त्यानंतर यासंबंधीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं. तसंच ज्या भागात मृतदेह सापडला तिथलाही तपास करण्यात आला. तांत्रिक पुरावेही तपासण्यात आले. ज्यानंतर पोलिसांना काही मद्याच्या बाटल्या आढळून आल्या, या बाटल्यांच्या शेजारी काही कपटेही आढळून आले. ज्यामुळे पोलिसांना या हत्या प्रकरणातले महत्त्वाचे धागेदोरे आढळून आले.

लोकेंद्रच्या पत्नीसह आणखी दोघांना अटक

हातात पुरेसे पुरावे आल्यानंतर पोलिसांनी लोकेंद्रच्या पत्नीला, तिचा मित्र महेश प्रजापती आणि त्याचा मित्र अशा तिघांना अटक केली. या सगळ्यांची कसून चौकशी केल्यानंतर लोकेंद्रच्या हत्येची घटना उलगडली. महेश आणि लोकेंद्रच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. लोकेंद्रला याबाबत कळलं होतं त्यामुळे या दोघांनीही लोकेंद्रचा काटा काढला.

१ एप्रिलला काय घडलं होतं ?

महेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तो म्हणाला लोकेंद्र १ एप्रिलला घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या पत्नीने मला फोन करुन त्याबाबत सांगितलं. महेश लोकेंद्रला भेटला आणि आपण दारु पिऊ असं त्याने लोकेंद्रला सांगितलं. धरमवीर नावाचा एकजणही त्यांच्यासह होता. या तिघांनी मग अन्न पार्सल घेतलं. दारु बरोबर होतीच, एका शेतात ते तिघंही बसले. जेवण वगैरे झाल्यानंतर, दारु प्यायली. त्यानंतर महेश आणि धरमवीरने लोकेंद्रचा गळा दाबला. लोकेंद्रचा श्वास कोंडला आणि तो बेशुद्ध झाला. त्यांना वाटलं की तो मेला आहे. या दोघांनीही लोकेंद्रच्या शरीरावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. ज्यात लोकेंद्रचा मृत्यू झाला. या प्रकरणात महेश, धरमवीर आणि लोकेंद्रच्या पत्नीला अटक केली आहे.