बेल्जिअममध्ये ९० वर्षीय महिलेला एकाच वेळी करोनाच्या दोन वेगळ्या विषाणूंची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या या महिलेला करोनाच्या अल्फा आणि बेटा या दोन्ही विषाणूंची लागण झाली होती. ही दुर्मिळ घटना असून कमी लेखली जाऊ शकते असंही संशोधकांनी यावेळी सांगितलं आहे.

लसीकरण न झालेली ही महिला आपल्या घऱात एकटी राहत होती. बेल्जिअम शहरातील रुग्णालयात महिलेला मार्च महिन्यात दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी महिलेला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. महिलेची ऑक्सिजन पातळी यावेळी योग्य होती. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली असता महिलेच्या शरिरात ब्रिटनमधील अल्फा स्ट्रेन आणि दक्षिण आफ्रिकेत सर्वात प्रथम समोर आलेला बेटा व्हेरियंट आढळला.

“त्यावेळी बेल्जिअममध्ये करोना विषाणूच्या या दोन्ही व्हेरियंटचा फैलाव होत होता. त्यामुळे महिलेला दोन वेगळ्या लोकांकडून दोन्ही वेगळ्या विषाणूंची लागण झाल्याची शक्यता आहे,” अशी माहिती ओएलव्ही रुग्णालयातील संशोधनाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. महिलेला संसर्ग कसा झाला हे दुर्दैवाने माहिती नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

एकाच वेळी दोन वेगळ्या प्रकारच्या विषाणूंची लागण झाल्याने महिलेची प्रकृती खालावली का हे सांगणं सध्या कठीण असल्याचं संशोधक म्हणाले आहेत. दरम्यान हे दुर्मिळ प्रकरण असल्याचं त्यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे.