३२ वर्षीय तरूणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह भाडे तत्त्वावर असलेल्या घरामागच्या बागेत पुरला. त्यानंतर या महिलेचा लिव्ह इन पार्टनर पळून गेला. घरमालक घरी पोहचला होता, त्याला घराला कुलुप दिसलं आणि बागेत खोदकाम झाल्याचं दिसलं त्याला संशय आला त्यामुळे त्याने पोलिसांना कळवलं आणि ज्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली आहे.
नेमकी घटना काय घडली?
किरण असं हत्या झालेल्या तरूणीचं नाव आहे ती प्रवेश नावाच्या २२ वर्षांच्या तरूणासह राहात होती. किरण ही माझी पत्नी आहे असं त्याने आम्हाला सांगितलं होतं असं या घरमालकाने पोलिसांना सांगितलं. प्रत्यक्षात हे दोघं लिव्ह इनमध्ये राहात होते असं पोलिसांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. या दोघांनी माझं घर भाडे तत्त्वावर घेतलं होतं. हे दोघंही उत्तर प्रदेशातले होते. दोन महिन्यांपूर्वी ते इथे राहायला आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरच्या प्रेस्टिज कॉलनी भागात हे भाडे तत्त्वावरचं घर होतं.
पोलिसांनी नेमकं या घटनेबाबत काय सांगितलं?
पोलीस अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितलं की प्रवेशने तीन दिवसांपूर्वी किरणची हत्या केली. त्यानंतर घराच्या मागे असलेल्या बागेत खड्डा खणला आणि त्यानंतर तिचा मृतदेह पुरला. त्यानंतर त्याने घराला कुलूप लावलं आणि तिथून पळ काढला. घरमालक रविवारी सकाळी आपल्या घराला भेट द्यायला आले. त्यांना कळलं की आपलं घर बंद आहे आणि प्रवेश आणि किरण यांच्यापैकी कुणीही घरात नाही. ज्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. तसंच त्यांना हे कळलं की बागेत खोदकाम झालं आहे. एवढंच नाही तर एका महिलेचा हात तिथे त्यांना आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना या ठिकाणी बोलवलं. ज्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
किरणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरणचा मृतदेह कनवटिया रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. किरणचा मृतदेह बागेत पुरलेला होता. ज्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं. फॉरेन्सिक टीमने हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. तसंच प्रवेश हा तरूण बिंदायाका या ठिकाणी असलेल्या फॅक्टरीत काम करत होता किरणच्या हत्येनंतर तो फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत. तसंच पोलिसांनी या घटनेची माहिती किरणच्या कुटुंबीयांना दिली आहे. किरणची हत्या प्रवेशने का केली? त्यामागचं कारण काय होतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्नही पोलीस करत आहेत.
