एका महिलेने तिच्या प्रियकराच्या साथीने तिच्या ३४ वर्षीय पतीची आणि तिच्या मुलाची हत्या केली आहे. सुरुवातीला दोन मृत्यू अचानक झाले असं वाटलं होतं. मात्र हे नैसर्गिक मृत्यू नसून हत्या आहे ही बाब समोर आली. ही घटना बंगळुरुतल्या चिक्काबनावरची आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की महिलेनेच तिच्या पतीला आणि तिच्या मुलाला ठार केलं.

नेमकी घटना काय?

बंगळुरुतल्या चिक्काबनावर या ठिकाणी राहणाऱ्या महिलेने तिच्या ३४ वर्षीय नवऱ्याला म्हणजेच अभिनंदनला तिच्या प्रियकराच्या साथीने ठार केलं. या महिलेच्या प्रियकराचं नाव विनय असं आहे. अभिनंदनला विनय आणि ही महिला मारत होते तेव्हा महिलेचा पाच वर्षांचा मुलगा यदुवीर जागा झाला. ज्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने या महिलेने मुलाच्या तोंडावर उशी दाबली आणि त्याचा श्वास कोंडवला आणि त्याचाही जीव घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव हरीनी असं आहे. हरीनी आणि अभिनंदन यांचं भांडण झालं होतं. हरीनीला अभिनंदनने मारहाण केली होती. यानंतर हे दोघंही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपत होते. यानंतर काही दिवसांनी हरीनीने तिचा प्रियकर विनयला बोलवून घेतलं. या दोघांनीही अभिनंदनवर हल्ला केला. त्याच्या तोंडावर उशी दाबली हा प्रकार मुलाने पाहिला त्यामुळे त्यालाही या महिलेने संपवलं.

महिलेला अटक, तिचा प्रियकर फरार

पोलिसांनी अशीही माहिती दिली की ज्या घरात ही घटना घडली तिथून रक्ताचे डाग स्वच्छ करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी हरीनीला अटक केली आहे. तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी तिची चौकशी केली जाते आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. दुसरीकडे पोलीस विनयचाही शोध घेत आहेत. हरीनीला अटक झाल्यानंतर विनय फरार झाला आहे. मात्र पोलिसांनी पथकं तयार करुन त्याचा शोध सुरु केला आहे.