पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन सख्या भावांशी प्रेमसंबंध ठेवून एका महिलेनं जमिनीसाठी सासूचा खून केल्याचं प्रकरण झाशी येथे घडलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून तीन जणांना अटक केली आहे. ५४ वर्षीय सासू सुशीला देवी यांचा त्यांच्याच सुनेनं खून केला. यानंतर सून पूजा तिची बहीण कमला आणि या गुन्ह्यात मदत करणारा कमलाचा प्रियकर अनिल वर्मा यांना ताब्यात घेण्यात आले.
झाशीचे पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितलं की, तीन आरोपींनी सुशीला देवी यांचा खून केल्यानंतर त्यांच्या घरातील आठ लाख किंमतीचे दागिने लंपास केले. हे चोरलेले दागिने अनिल वर्मा विकण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत पोलिसांनी त्याला अडवले. पोलिसांनी थाबंविल्यानंतर आरोपी अनिल वर्माने पोलिसांवरच गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार करत वर्माला जखमी अवस्थेत अटक केली.
खून कसा उघडकीस आला?
२४ जून रोजी सुशीला देवी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांनी सांगितले की, सून पूजाला तिच्या हिस्स्याची जमीन विकून (आठ बिघा) मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरला जायचं होतं. या कुटुंबाकडे एकूण १६ बिघा जमिन आहे.
दीर संतोषबरोबर पूजाचे प्रेमसंबंध होते. संतोष आधीच विवाहित असूनही त्याचे वहिनीबरोबर प्रेमसंबंध सुरू होते. या संबंधाला सासरे अजय यांनीही परवानगी दिली होती. दरम्यान सुशीला देवी मात्र या नात्याच्या विरोधात होत्या. त्यामुळे सासू सुशीला देवी यांना रस्त्यातून बाजूला करण्यासाठी हत्येची योजना आखली, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी असेही सांगितले की, पतीचं निधन झाल्यानंतर धाकटा दीर कल्याण सिंह याच्याबरोबर पूजा लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. पण सहा वर्षांपूर्वी कल्याण सिंहचे निधन झालं. तेव्हा पूजाचं दुसरा दिर संतोषसह प्रेमप्रकरण सुरू झालं. संतोषपासून पूजाला एक मुलगीही झाली आहे. दरम्यान संतोषच्या पत्नीला हे संबंध मान्य नव्हते. म्हणून ती नऊ महिन्यांपूर्वीच माहेरी निघून गेली होती.
पूजाला अटक झाल्यानंतर तिने सुशीला देवी यांची हत्या केल्याचे कबुल केले. तसेच या गुन्ह्यात बहीण कमला आणि तिचा अनिल वर्मानं मदत केल्याचंही तिनं मान्य केलं.