मेघालय या ठिकाणी मधुचंद्रासाठी गेलेल्या सोनम आणि राजा रघुवंशीच्या बातमीचं वास्तव आपल्या समोर जून महिन्यांत आलं. सोनमने राजाची हत्या कशी घडवून आणली ते पाहून सगळा देश हादरला होता. दरम्यान आता बिहारमधून अशीच एक घटना समोर आली आहे. २४ वर्षांच्या महिलेने तिच्या नवऱ्याला लग्नानंतर अवघ्या ४५ दिवसात संपवलं आहे. तिच्या आत्याच्या नवऱ्यासह मिळून तिने हा कट रचला होता.
नेमकी काय घडली घटना?
बिहारमधल्या औरंगाबाद येथील नबीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना आहे. या गावातील रहिवासी प्रियांशु कुमार सिंह उर्फ छोटूच्या हत्याकांडाचं गूढ पोलिसांनी उलगडलं आहे. पोलिसांनी या हत्येच्या आरोपात प्रियांशुची पत्नी गुंजादेवीसह एकूण तिघांना अटक केली आहे. महेंद्र चौबे आणि रामाशिष शर्मा अशी अटक केलेल्या इतर दोघांची नावं आहेत. प्रियांशु आणि गुंजादेवी यांचं लग्न ४५ दिवसांपूर्वीच झालं होतं. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात पत्नीने पतीची हत्या घडवून आणली आहे. गुंजादेवी आणि तिच्या आत्याच्या नवऱ्याचे मागील १५ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. याच प्रेमसंबंधांतून तिने ही हत्या घडवून आणली. तिने तिचा काका जीवन सिंह याच्यासह कट रचून प्रियांशुची हत्या घडवून आणली.
गुंजाचा मोबाइल जप्त केल्यानंतर लागला हत्येचा छडा
पोलिसांनी गुंजाचा मोबाइल जप्त केला आहे. ज्यानंतर प्रियांशुच्या हत्येची माहिती समोर आली. गुंजाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांना तिने सांगितलं की आत्याच्या नवऱ्याचं आणि माझं प्रेम होतं. त्यांच्याशी बोलली नाही तर मी आणि ते दोघंही अस्वस्थ व्हायचो. मात्र प्रियांशु आम्हाला बोलू द्यायचा नाही. प्रियांशुने मनाई केल्यावरही आम्ही बोलत होतो. गुंजाच्या आत्याचा नवरा जीवन सिंह याचे राजकीय संबंध अनेकांशी चांगले आहेत. ट्र्रॅव्हल बसेसचा त्यांचा व्यवसाय आहे. तसंच त्याचं एक बाईक शो रुम आहे अशी माहिती गुंजाने पोलिसांना दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
प्रियांशुच्या हत्येबाबत पोलिसांनी काय सांगितलं?
प्रियांशु २४ जूनला त्याच्या घरी परतत होता. त्यावेळी गुंजादेवीने तो घरी येत असल्याची माहिती तिचे काका जीवन यांना दिली. जीवनने मग प्रियांशुला ठार करण्यासाठी सुपारी दिली. शूटर्सकडून त्याची हत्या घडवून आणली. लेंबोखाप नावाच्या गावाजवळ शूटर्सनी प्रियांशुची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयशंकर चौबे आणि मुकेश शर्मा या दोघांनी शूटर्सना मोबाइलचं सीम घेऊन दिलं होतं. या घटनेनंतर पोलीस आता शूटर्स आणि जीवन सिंह या सगळ्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंजाला प्रियांशु ने बजावलं होतं की आत्याच्या नवऱ्याशी तू बोलू नकोस किंवा कुठलाही संवाद साधू नकोस. गुंजा तिचा काका व्हिडीओ कॉलवर बोलत असे. त्यानंतर गुंजा तिच्या मोबाइलवरुन तिच्या काकाला तिचे अश्लील फोटोही पाठवत होती अशीही माहिती पोलिसांनी दिली.