VIDEO: जमावाने तरुणीला रस्त्यात अडवून काढायला लावला हिजाब आणि बुरखा; ती रडत विनवणी करत होती पण…

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे

MP, Madhya Pradesh, Hijab
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे

मध्य प्रदेशात स्कूटरवरुन निघालेल्या तरुणीला लोकांनी बुरखा आणि हिजाब काढायला लावल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या इस्लाम नगरमध्ये ही घटना घडली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत स्कूटरवरुन जात असताना त्यांना थांबवण्यात आलं. यानंतर तरुणीला आधी बुरखा आणि नंतर हिजाब काढण्याची जबरदस्ती करण्यात आली. तरुणी यावेळी रडत असतानाही लोक मात्र ऐकण्यास तयार नव्हते.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुणी रडत असून विरोध करताना दिसत आहे. मात्र यावेळी तिथे उपस्थित व्यक्ती तरुणीला तुम्ही आमच्या समाजाची बदनामी करत आहात असं सांगत हिजाब काढण्यास सांगताना ऐकू येत आहे. तरुणीसोबत असणारा तरुणदेखील जमावाला विनंती करतो, मात्र ते काहीही ऐकून घेत नाहीत. यावेळी एक व्यक्ती तर तरुणीने जीन्स घातली आहे यावरही आश्चर्य व्यक्त करत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी हिंदू तरुणासोबत फिरत असल्याचा संशय आल्याने त्या लोकांनी त्यांना जबरदस्ती थांबवलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र स्कूटर थांबवणाऱ्या दोघांना बोलावून पोलिसांनी पुन्हा असं कृत्य करु नये अशी ताकीद दिली आहे.

पोलीस अधिकारी आर एस वर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “एक तरुणी आणि तरुण दुपारी इस्लाम नगरमध्ये आले होते. यावेळी काही लोकांनी त्यांना थांबवलं आणि तरुणीला हिजाब काढत चेहरा दाखवण्यास सांगितलं. तरुणी मुस्लिम आणि तरुण हिंदू असल्याचा त्यांना संशय होता”.

“याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र व्हिडीओत दिसणाऱ्या दोघांना पुन्हा असं कृत्य करु नये अशी ताकीद दिली आहे,” माहिती वर्मा यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman riding pillion forced to take off hijab in madhya pradesh sgy

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या