उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक २३ वर्षीय अविवाहित तरुणी गर्भवती असल्याचं समजताच तिच्या कुटुंबीयांनी तिला भयंकर शिक्षा दिली आहे. आरोपींनी पीडित मुलीला जंगलात नेऊन तिला जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या भयावह घटनेत पीडित युवती ७० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या भावाला आणि आईला ताब्यात घेतलं आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना हापूर जिल्ह्याच्या नवादा खुर्द गावात घडली. ७० टक्क्यांहून अधिक भाजलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अविवाहित तरुणीचे त्याच गावातील एका तरुणाबरोबर शारीरिक संबंध होते. यातून ती गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी हे संतापजनक कृत्य केलं आहे. गुरुवारी (२८ सप्टेंबर) पीडित तरुणीची आई आणि भाऊ तिला जवळच्या जंगलात घेऊन गेले. याठिकाणी त्यांनी पीडितेच्या अंगावर पेट्रोल शिंपडलं आणि तिला पेटवून दिलं. पीडित तरुणी गंभीर भाजल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, पीडित मुलीची आई आणि भावाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आईसह भावाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.