Woman Skeleton Found In Bengaluru Home : बेंगळुरूच्या बागलकुंटे भागात एका घरात एकट्याच राहणाऱ्या ५७ वर्षीय महिलेचा सांगाडा आढळल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या महिलेचा मृत्यू जवळपास एक वर्षापूर्वी झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दाक्षायिणी असं मृत महिलेचं नाव आहे. तिचं दुमजली घर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने संशय बळावला आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी तिच्या घरात हा सांगाडा आढळून आला.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “हे घर बऱ्याच काळापासून शांत होतं. घराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाडेकरूंच्या दलालांसह (ब्रोकर्स) ज्यांनी कोणी तिथे जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना दरवाजा उघडता आला नाही. काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले.” बागलकुंटे पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दाक्षायिणीचा सांगाडा ताब्यात घेतला. तिचा मृत्यू कसा आणि कधी झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
महिला मानसिक आजाराने ग्रस्त होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाक्षायिणी गेल्या अनेक वर्षांपासून एकटीच राहत होती. २००५ मध्ये तिच्या मुलाचा आरोग्याच्या समस्यांमुळे मृत्यू झाला होता, जो तिच्यासाठी मोठा धक्का होता. या दुःखाचा तिच्यावर खोल परिणाम झाला, ज्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडली आणि पुढे तिला स्किझोफ्रेनिया या आजाराचं निदान झाले. तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले होते आणि तिची काळजीही घेतली होती.
२०१७ मध्ये तिचे पती उमेश यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतरही दाक्षायिणी हावनूर लेआउटमधील या घरात एकटीच राहत राहिली. तिचा ५० वर्षीय भाऊ महेश याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबीयांचा दाक्षायिणीशी कोणताही संपर्क नव्हता. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तिच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नाही.
“मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण स्पष्ट होण्यासाठी आम्ही पुढील वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करत आहोत”, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
