scorecardresearch

नवविवाहित महिलेने नवऱ्यावर केला बलात्काराचा आरोप

नवविवाहित महिलेने नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. नवरा मनाविरुद्ध शरीरसुखासाठी जबरदस्ती करतो असा आरोप या महिलेने केला आहे.

कोलकात्याच्या सिंथी भागात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. नवरा मनाविरुद्ध शरीरसुखासाठी जबरदस्ती करतो असा आरोप या महिलेने केला आहे. सासू-सासरेही हुंडयासाठी आपला छळ करतात. मानसिक त्रास देतात असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

गर्भवती झाल्यानंतरही मारहाण सुरु असल्याने या महिलेने तक्रार नोंदवण्यासाठी कोर्टात धाव घेतली. पत्नीने पतीवरच बलात्काराचा आरोप करण्याचे हे दुर्मिळ प्रकरण आहे असे कोलकात्यामधील वकीलांनी सांगितले. जेव्हा हे लग्न ठरले तेव्हा महिलेच्या कुटुंबाला नवरामुलगा खासगी बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर असल्याचे सांगण्यात आले होते. पण जेव्हा ही महिला लग्न होऊन सासरी आली तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आपला नवरा एका खासगी कंपनीत ज्युनियर पदावर काम करत असल्याचे तिला समजले. काही दिवसांनी त्याने कामावर जाणेही बंद केले असे या महिलेने सांगितले.

फसवणूक झाल्यामुळे आपण नवऱ्याला टाळायला सुरुवात केली तेव्हा त्याने शरीरसुखासाठी जबरदस्ती सुरु केली. सासू-सासरेही आपल्याला त्रास देत होते. कुठलाही अन्य पर्याय शिल्लक नसल्याने आपल्याला कोर्टाकडे दाद मागावी लागली असे या महिलेने सांगितले. आम्ही या घटनेचा सर्व अंगांनी तपास करत असून वकीलांचीही मदत घेत आहोत. आम्हाला लगेच कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचे नाही असे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एफआयआर दाखल होणे ही पहिली पायरी आहे. पोलीस आरोपपत्र काय दाखल करतात ते महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman slap rape charges against husbund

ताज्या बातम्या