उत्तर प्रदेशमधल्या संभल जिल्ह्यात एक अजब प्रेमप्रकरण पाहायला मिळालं आहे. येथील एका मुलीचा बॉयफ्रेंड तिच्यापासून लपवून दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. परंतु ऐनवेळी त्याची गर्लफ्रेंड तिथे आली आणि तिने ते लग्न थांबवलं. इतकंच नव्हे तर ती तिच्या बॉयफ्रेंडला सोबत घेऊन गेली. तरुणीच्या एंट्रीने बॉयफ्रेंडचं लग्न मोडलं. परंतु मुलाच्या पालकांनी त्याच्या धाकट्या भावासोबत नवरीचं लग्न लावून दिलं. या अजब गजब प्रेमप्रकरणाची आणि लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हे प्रकरण संभल जिल्ह्यातील गुन्नौर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलं आहे. असं म्हटलं जात आहे की, गुन्नौर येथील डॅनी ५ वर्षांपूर्वी कामासाठी दिल्लीला गेला होता. दिल्लीत काम केल्यानंतर डॅनीने लक्ष्मी नगर ठाणे अंतर्गत राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू केलं.
लग्न मंडपात पोलिसांना घेऊन गेली गर्लफ्रेंड
डॅनीने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लपून छपून प्रेमविवाह केला आहे. दोघे एकत्र राहात होते. काही महिन्यांपूर्वी तो त्याच्या घरी गुन्नौरला परतला. गुन्नौरमध्येच तो नगर पंचायतीत सफाई कर्मचाऱ्याचं काम करू लागला. याचदरम्यान त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला न सांगता अलीगड येथील एका तरुणीसोबत त्याचं लग्न ठरवलं. डॅनी गुरुवारी लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघणार होता. नवरदेवाला हळद लावली जात होती. त्याचवेळी डॅनीची पत्नी पोलिसांसोबत तिथे पोहोचली. तिने डॅनीच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना पाच वर्षांपूर्वी झालेल्या त्यांच्या लग्नाची माहिती दिली.
लग्नाचे फोटो देखील दाखवले
तरुणीने त्यांच्या लग्नाचे फोटो देखील दाखवले. त्यानंतर पोलीस डॅनीला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. डॅनी त्याच्या पत्नीसोबत राहण्यास तयार झाला. त्यानंतर ती डॅनीला घेऊन दिल्लीला गेली. दरम्यान, लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. त्यामुळे डॅनीच्या कुटुंबियांनी डॅनीच्या धाकट्या भावाला लग्नासाठी तयार केलं आणि सर्वजण वऱ्हाड घेऊन अलीगडला गेले. हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आहे.