Crime News : राजस्थानमध्ये चार वर्षीय मुलीच्या हत्येचं एक एका अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने तिच्या लिव्ह-इन पार्टनर बरोबर मिळून जयपूर ते राजस्थानच्या बारन जिल्ह्यापर्यंतचा ३०० किलोमीटरचा प्रवास तिच्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह घेऊन केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशनबाई आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर महावीर बैरवा यांच्यात त्यांच्या जयपूर येथील घरात वाद झाला. या भांडणादरम्यान या महिलेची मुलगी इशिका हिची हत्या झाली. अखेर हे दोघे प्रवास करून बारन येथील त्या व्यक्तीच्या घरी गेले आणि त्यानंतर या जोडप्याने मुलीचा मृतदेह एका दुपट्ट्यात बांधून प्लास्टीक बॅगेत घातला आणि हा मृतदेह एका कपाटामध्ये ठेवला.
शनिवारी त्या व्यक्तीचे वडील जयराम बैरवा यांना कपाटातून कसलातरी उग्र वास येऊ लागला, इतकेच नाही तर त्या कपाटातून रक्त देखील बाहेर येत होतं, यानंतर त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला आणि प्रकरण उजेडात आलं.
बारनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेश चौधरीयांनी या संपूर्ण घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, इशिका ही रोशनबाई आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती रविंदर बैरवा यांची मुलगी होती. ती गेल्या सात महिन्यांपासून तिच्या आई आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर यांच्याबरोबर राहत होती. महावीर बैरवाला अटक करण्यात आली आहे, तर रोशनबाईचा शोध सुरू आहे.
महावीर बैरवा याच्यावर खून, दरोडा, चोरी आणि प्राणघातक हल्ला करणे असे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये एका शेतकऱ्याच्या हत्येच्या प्रकरणात त्याला तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती आणि एक वर्षापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला आहे.