scorecardresearch

ती मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही, तर…; चोक्सीच्या वकिलांनी केला धक्कादायक दावा

चोक्सी कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर फिरण्यासाठी गेला होता असं अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं.

ती मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही, तर…; चोक्सीच्या वकिलांनी केला धक्कादायक दावा

पंजाब नॅशनल बँकेत १३५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी काही दिवसांपूर्वी अँटिग्वा फरार झाला होता अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. मेहुल चोक्सी कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर डोमिनिकामध्ये फिरण्यासाठी गेला होता आणि तिथे त्याला अटक करण्यात आली असं अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी सांगितलं होतं. तर आता चोक्सीचे अँटिग्वामधून अपहरण करुन त्याला डोमिनिकामध्ये नेण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.

या सर्वांच्या दरम्यान, चोक्सीचे वकिल विजय अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की, “मेहुल चोकसी स्वतः अँटिगाहून डोमिनिकाला गेले नव्हते तर त्याचे अँटिगा येथून अपहरण करुन डोमिनिका येथे नेण्यात आलं.” ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

मेहुल चोक्सी यांचं अपहरण करण्यात आलं होतं. ज्यावेळी चोक्सी यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्यासोबत त्याची प्रेयसी होती असे सांगण्यात येत आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार “काही महिन्यांपूर्वीच ती महिला मेहुल चोक्सीच्या घराशेजारी राहण्यासाठी आली होती. चोक्सीच्या घरच्यांसोबत त्या महिलेचे चांगले संबधं होते. काही दिवसांपूर्वी ती महिला दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेली. त्यानंतर चोक्सीला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले. त्या महिलेला भेटण्यासाठी चोक्सी तेथे गेला पण त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यानंतर चोक्सीला डोमिनिका येथून अटक केल्याची माहिती समोर आली,” असे वकिलांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- मेहुल चोक्सीच्या गर्लफ्रेण्डचे फोटो आले समोर; डिनर डेटला गेलेला असतानाच झाली अटक

मेहुल चोक्सीच्या वकिलांनी या प्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. “ज्या महिलेसोबत अँटिगाहून चोक्सी डोमिनिकाला गेला होता असे सांगण्यात येत आहे ती महिला कुठे आहे असा सवाल त्यांनी केला आहे. चोक्सीला एका बोटीतून अँटिगाहून डोमिनिकाला नेण्यात आला आणि हा सर्व एका गुप्त कारवाईचा भाग होता”, असा आरोप चोक्सीच्या वकिलांनी केला आहे.

“चोक्सीला अँटिगाहून डोमिनिकाला जायचं असतं तर तो पासपोर्ट घेऊन गेला असता. मेहुल चोक्सीचा पासपोर्ट त्याच्या अँटिगाच्या घरी आहे आणि तो कोणतंही सामान घेऊन गेला नाही. चोक्सी गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाने अँटिगाच्या पोलिसांकडे याची माहिती दिली होती. चोक्सी जर अँटिगामध्ये सुरक्षित होता तर तो तिथून बाहेर का पडला असता?” असं वकिलांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मेहुल चोक्सीचं अँटिग्वामधून अपहरण करुन छळ; शरीरावर मारहाणीच्या खुणा; वकिलांचा कोर्टात दावा

“ही एक संयुक्त कारवाई आहे जी काही देशांनी एकत्रितपणे केली आहे. भारत सरकारने डोमिनिका आणि अँटिगासारख्या छोट्या देशांना देखील लस पाठविली होती. त्यानंतर हे सर्व झाले असावे. चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण करणं सोपं नाही. भारतीय नागरिकत्व कायद्यात असे स्पष्टपणे लिहिले आहे की एकदा एखादी व्यक्तीने दुसर्‍या देशाचे नागरिकत्व स्विकारले तर त्याचे भारताचे नागरिकत्व रद्द होते. अशा परिस्थितीत डोमिनिकाला चोक्सीला परत पाठवायचे असेल तर ते भारतात नव्हे तर अँटिगा येथे पाठवता येऊ शकते आणि भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढावी लागेल”, असा दावा चोक्सीच्या वकिलांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2021 at 08:08 IST

संबंधित बातम्या