Woman’s Body Found in Suitcase in Bengaluru : रेल्वे पुलाजवळ सापडलेल्या एका फाटलेल्या निळ्या सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीची हत्या करून ही सुटकेस ट्रेनमधून बाहेर फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. बंगळुरूत ही घटना घडली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
बेंगळुरूच्या बाहेरील जुन्या चांदापुरा रेल्वे पुलाजवळ स्थानिक रहिवाशांना ही सुटकेस सापडली. ही सुटकेस चालत्या ट्रेनमधून फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलंय की महिलेची इतरत्र हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आला असावा. “आम्हाला मृतदेहावर कोणतेही ओळखपत्र सापडलेले नाही आणि महिलेचे नाव, वय आणि ती कुठून आली यासारखी माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बेंगळुरू पोलीस प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक (बेंगळुरू ग्रामीण) सीके बाबा म्हणाले, “आम्ही आमची चौकशी सुरू केली आहे. असे दिसते की ही सुटकेस रेल्वेतून फेकण्यात आली होती. जरी अशी प्रकरणे सामान्यतः रेल्वे पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येतात, परंतु आम्ही त्यात सामील आहोत कारण या घटनेचा आमच्या क्षेत्राशी संबंध असू शकतो. सुटकेसमध्ये फक्त मृतदेह होता – ओळखपत्र किंवा वैयक्तिक वस्तू सापडल्या नाहीत. मुलगी किमान १८ वर्षांची असल्याचे दिसून येते, परंतु तिची ओळख अद्याप पटलेली नाही.”
मार्चमध्येही घडली होती अशीच घटना
मार्चमध्ये अशाच एका प्रकरणात, गौरी अनिल सांबेकर या ३२ वर्षीय महिलेचा मृतदेह बेंगळुरूच्या हुलीमावू येथील एका घरात सुटकेसमध्ये भरलेला आढळला होता. तिचा पती राकेश सांबेकर याला पुण्यातून अटक करण्यात आली होती आणि त्याने तिच्या पालकांना फोन करून हत्येची कबुली दिल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील या जोडप्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि ते जानेवारीमध्ये बेंगळुरूला स्थायिक झाले होते. राकेश एका आयटी फर्ममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता तर, गौरी नोकरीच्या शोधात होती.