Lucknow Woman Frames Husband False Case: प्रियकराबरोबर राहायला मिळावे, यासाठी पतीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी उत्तरप्रदेशच्या लखनौमधील एका पत्नीनं धक्कादायक कट रचला होता. पतीच्या गाडीत दोन वेळा गोमांस ठेवून त्याला पोलिसांकरवी अटक करण्याचा कट पत्नीनं रचला होता. मात्र अखेर पोलिसांच्या तपासात पत्नीच कचाट्यात अडकली. पहिल्यांदा सप्टेंबर २०२५ मध्ये पतीच्या गाडीत गोमांस ठेवण्यात आले होते. तेव्हा पती काही दिवस तुरुंगात होता. त्यानंतर तो बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा गोमांस ठेवून त्याला अडकवण्यात आले. मात्र पोलिसांच्या तपासात पत्नीचा कट उघड झाला.
कसं उलगडलं प्रकरण?
१४ जानेवारी रोजी काकोरी येथील दुर्गागंज परिसरात पोलिसांनी ऑनलाइन पोर्टरच्या गाडीला अडवले. या गाडीत त्यांना १२ किलो गोमांस आढळून आले. ड्रायव्हरनं सांगितलं की, सदर सामानाची डिलिव्हरी अमीनाबादच्या वासिफ याच्या नावावर करायची आहे. मात्र वासिफने अशी कोणतीही ऑर्डर दिली नसल्याचे सांगितले. मात्र ऑर्डरसाठी आलेला ओटीपी वासिफच्या मोबाइलवरच आला होता.
पोलिसांनी चौकशी केली असता वासिफने सांगितले की, जेव्हा ओटीपी आल्याचा वेळ दिसतोय, तेव्हा तो बाथरूममध्ये होता. या जबाबानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केला. तेव्हा त्यांना कळले की, सदर ऑर्डर वासिफच्या पत्नीने दिली होती. वासिफच्या पत्नीने तिचा मध्यप्रदेशातील प्रियकर अमानसह मिळून सदर कट रचल्याचे चौकशीत समोर आले.
काकोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश चंद्र राठोड यांनी सांगितले की, वासिफच्या ओळखपत्राचा वापर करून अमानने अमीनाबादसाठी ऑनलाइन पोर्टर बुक केला होता. भोपाळहून गोमांस घेऊन ते या गाडीत एका डब्यात लपविण्यात आले होते. पोलिसांनी सदर गाडी पकडावी यासाठी अमान स्वतःचे नाव ‘राहुल’ असल्याचे सांगून बजरंग दलाच्या गटात सामील झाला होता. त्यांना ही गुप्त माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांसह सदर वाहन अडवले.
पहिल्या प्रयत्नातून पती वाचला
पोलिसांनी जेव्हा खोलात जाऊन तपास केला तेव्हा अमान आणि वासिफच्या पत्नीने मागच्या वर्षीही त्याला फसविल्याचे समोर आले. २०२२ मध्ये अमान आणि वासिफच्या पत्नीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले. दोघांना एकत्र राहायचे होते, यासाठी त्यांनी वासिफला फसविण्याची योजना बनवली.
सप्टेंबर २०२५ मध्ये वासिफच्या महिंद्रा थार गाडीत त्यांनी २ किलो गोमांस ठेवले होते. याची माहिती पोलिसांना देऊन त्यांनी वासिफला अडकवले. या प्रकरणात वासिफला काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. मात्र पुरावे आढळले नसल्यामुळे तो या प्रकरणातून सुटला. यामुळे अमान आणि वासिफच्या पत्नीने त्याला पुन्हा फसविण्याची योजना आखली. मात्र यात तेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
