शनिशिंगणापुरात तणाव; परस्परविरोधी घोषणाबाजी
शनििशगणापूर (ता. नेवासे) येथे चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुणे येथील भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या चार महिलांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले असता झटापट झाली, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलविले असून गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व घटना होत असतानाही हजारो शनिभक्तांचे दर्शन मात्र सुरळीत सुरू होते.
शनििशगणापूर येथे दर्शनबारी सुरू असताना दुपारी पावणेतीनच्या सुमारास पुणे येथील भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, प्रियंका जाधव, दुर्गा शुक्रे, पुष्पा केवडकर या दर्शनासाठी रांगेतून येण्याऐवजी महादेव व दत्त मंदिराच्या बाजूने आल्या. त्यांनी दक्षिण बाजूने चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तेथे सुरक्षा कर्मचारी संभाजी वैरागर, गणेश नाणेकर, सुरेश वरपे, आदिनाथ कुसमुडे यांनी त्यांना अडवले. त्या वेळी झटापट झाली असता सुरक्षा अधिकारी संभाजी बोरुडे यांना कळवण्यात आले. या वेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही भाविकांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. संस्थानने त्वरित पोलिसांना बोलावले. सोनई पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत मंडले हे पथकासह देवस्थानच्या आवारात हजर झाले. शनिदेवाच्या चौथऱ्यावर सुरक्षेच्या कारणामुळे महिला अथवा पुरुषांना जाऊ दिले जात नाही. त्यामुळे येथे भेदभाव नाही. रूढी व परंपरेनुसार तेथे जाऊन दर्शन घेऊ दिले जाणार नाही, असे संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी बजावले. एक तासानंतर या महिलांनी शनििशगणापूर पोलीस ठाण्यात आम्हाला धक्काबुक्की केली, अशी तक्रार केली.
रात्री उशिरापर्यंत महिला व पुरुष गावकरी शनििशगणापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या देऊन होते. निरीक्षक मंडले यांनी त्यांची समजूत काढली.