Women MPs Lok Sabha Percentage Comparison : नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नुकतंच नामंजूर झालं. या विधेयकासाठी एकूण ५२८ सदस्यांनी मतदान केलं. मात्र, त्यापैकी २९८ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर २३० जणांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं. मात्र, हे विधेयक नामंजूर होणं हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, आता या विधेयकाच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करत विरोधकांवर जोरदार टीका केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला विरोधकांकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या एकूण खासदारांमध्ये महिला खासदार नेमक्या किती आहेत? एकूण खासदारांच्या तुलनेत कोणत्या पक्षाच्या महिला खासदारांची संख्या जास्त आहे? याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून खासदार महुआ मोइत्रा यांनी नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात.
कोणत्या पक्षाच्या महिला खासदारांची संख्या जास्त आहे?
तृणमूलच्या किती महिला खासदार आहेत?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये दावा केला की, १८ व्या लोकसभेत सध्या निवडून आलेल्या ७५ महिलांपैकी म्हणजे ५४३ सदस्यांपैकी पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचे एकूण २९ खासदार आहेत, त्या २९ पैकी ११ महिला खासदार तृणमूल काँग्रेसच्या आहेत, म्हणजे जवळपास ३८ टक्के हे प्रमाण झालं. सभागृहातील कोणत्याही प्रमुख पक्षांपेक्षा तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदारांचं हे प्रमाण सर्वाधिक आहे.
Dear @narendramodi your party has the lowest percentage of women among all parties in Lok Sabha . Implement Women’s Reservation NOW based on 543 seats – what is stopping you? Jumlabazi Nahi Chalegi pic.twitter.com/S9TfLsRW8s
— Mahua Moitra (@MahuaMoitra) April 18, 2026
डीएमके आणि समाजवादी पक्षाच्या किती महिला खासदार आहेत?
तामिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. डीएमकेच्या २२ खासदारांपैकी तीन महिला खासदार आहेत, म्हणजेच हे प्रमाण १३ टक्क्यांपेक्षा थोडं जास्त आहे. या यादीत उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष (SP) तिसऱ्या क्रमांकावर आहे. समाजवादी पक्षाच्या ३७ खासदारांपैकी ५ महिला खासदार आहेत, म्हणजेच १३.५ टक्के होय. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण देणाऱ्या विधेयकावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच ही आकडेवारी महुआ मोइत्रा यांनी पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे.
भाजपा आणि काँग्रेसच्या किती महिला खासदार आहेत?
लोकसभेतील सर्वात मोठे दोन पक्ष म्हणजे सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस. यामध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये वायनाडमधून प्रियांका गांधी वाड्रा यांच्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस आपल्या ९९ खासदारांपैकी १४ महिला खासदारांसह (१४.३ टक्के) चौथ्या स्थानावर आहे.
तसेच भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) ३१ महिला लोकसभा खासदार आहेत. यामध्ये एकूण संख्येच्या बाबतीत भाजपाच्या महिला खासदारांची संख्या जास्त असली तरी भाजपाच्या एकूण २४० खासदारांच्या तुलनेचा विचार केला तर भाजपाच्या महिला खासदारांचं प्रमाण फक्त १२.९ टक्के आहे, असा दावा करत महुआ मोइत्रा यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
मोदींनी काँग्रेस, द्रमुक, तृणमूल आणि समाजवादीवर काय टीका केली?
नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नुकतंच नामंजूर झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ एप्रिल रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात काँग्रेस, द्रमुक, तृणमूल आणि समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल आणि समाजवादी पक्ष महिला-विरोधी असल्याचा आरोप मोदींनी केला होता. मोदींनी म्हटलं होतं की, “आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे. मात्र, जेव्हा काही लोकांसाठी पक्षाचं हित सर्वस्व बनतं, पक्षाचं हित राष्ट्रीय हितापेक्षा मोठं ठरतं, तेव्हा त्याचा फटका महिला शक्तीला बसतो. यावेळीही तेच घडलं. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिला शक्तीला सहन करावा लागला आहे”, अशी टीका मोदींनी केली होती.

“काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजनीतीमुळे देशातील महिलांना नुकसान झालं आहे. देशातील कोट्यवधी महिलांची नजर संसदेवर होती, देशाची नारीशक्ती पाहत होती, मलाही हे पाहून खूप दुःखं झालं की नारीहिताचा प्रस्ताव पडला तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि सपा सारखे परिवारवादी पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलांपासून त्यांचे अधिकार हिरावून घेत हे पक्ष बेंचवर थाप देत होते. त्यांनी फक्त बेंच वाजवले नाहीत, त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली. महिला सर्व विसरू शकतात, पण आपला अपमान कधीच विसरत नाही. त्यामुळे संसदेत काँग्रेस आणि इतर पक्षांने संसेदत केलेला व्यवहार हे कधीच विसरणार नाही”, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता.
