Women Reservation Bill Defeated Lok Sabha: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. दोन दिवस वादळी चर्चा झाल्यानंतर अखेर २३० संसद सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले तर, केवळ २९८ खासदारांनी या विधेयकाच्या समर्थनात मतदान केले. विधेयक नामंजूर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांवर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. “विरोधी पक्षांना केवळ २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर प्रत्येक स्तरावर, प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक ठिकाणी ‘महिलांच्या रोषा’चा सामना करावा लागेल”, असे शाह म्हणाले.

अमित शाहांकडून नाराजी व्यक्त

महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले हा पराभव खरोखरच निंदनीय आणि अकल्पनीय आहे, अशा शब्दात अमित शाह यांनी नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षांवर टीका केली. “आज लोकसभेत एक अत्यंत विचित्र दृश्य पाहायला मिळाले. काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्षाने ‘नारी शक्ती वंदन कायद्या’ची आवश्यकता असलेल्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजूर होण्यापासून रोखले. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाचा जल्लोष आणि गौरव करत असतानाच, त्याचा झालेला पराभव खरोखरच निंदनीय आणि अकल्पनीय आहे,” असे अमित शाह म्हणाले.

काँग्रेस, मित्रपक्षांवर टीका

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची विचारसरणी महिलांच्या किंवा देशाच्या हिताची नाही, असेही शाह यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले. शाह यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये, “आता महिलांना लोकसभा आणि विधानसभेत त्यांच्या हक्काचे ३३ टक्के आरक्षण मिळणार नाही. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी असे पहिल्यांदाच केलेले नसून, वारंवार केले आहे. त्यांची विचारसरणी महिलांच्या किंवा देशाच्या हिताची नाही”, असे शाहांनी स्पष्ट केले.

विरोधकांना इशारा

विरोधकांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशाराही यावेळी अमित शाहांनी दिला. “मला त्यांना (विरोधी पक्षांना) सांगायचे आहे की महिलांचा हा अपमानाची ही गोष्ट इथेच थांबणार नाही; ती पुढे जाईल. विरोधी पक्षांना केवळ २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर प्रत्येक स्तरावर, प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक ठिकाणी ‘महिलांच्या रोषा’चा सामना करावा लागेल”, असे शाह म्हणाले.