Anita Devi Eloped: अलीगढमधील अनिता देवी नामक महिला एप्रिल २०२५ मध्ये आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीबरोबर पळाली होती. लग्नाची बोलणी करण्यादरम्यान जावयाच्या प्रेमात पडलेल्या अनिता देवीने लग्नाच्या दोन दिवस अगोदरच मुलीसाठी बनविलेले दागिने आणि रोकड लंपास करत पळ काढला होता. त्यानंतर केवळ १० महिन्यात आता अनिता देवीने पुन्हा एकदा दुसऱ्या पुरूषाबरोबर पळ काढला आहे. आता तिने माजी पतीच्या मेहुण्याबरोबर पळ काढला आहे.
अनिता देवीने १० महिन्यांपूर्वी होणारा जावई राहुलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. जावई राहुलही सासूवर भाळला. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून हे जोडपे बिहारची सीतामढी जिल्ह्यात राहू लागले. दहा महिन्याच्या येथील वास्तव्यात अनिता देवीचा संपर्क माजी पती जितेंद्र कुमारच्या मेहुण्याशी झाला. या मेहुण्याचा कापडाचा व्यवसाय आहे.
घरातून दोन लाखांची रोकड पळविल्याचा आरोप
एबीपी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, माझ्या सासूनं घरातून दोन लाख रुपयांची रोकड आणि दागिने घेऊन पळ काढला आहे. राहुलने अलीगढ येथे जाऊन या प्रकरणाची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्याला सीतामढी येथेच तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.
मागच्या वर्षी काय झाले होते?
अलीगढमधील मडराक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील जितेंद्र कुमार बंगळुरूत काम होते. त्यांनी आपली मुलगी शिवानीचे लग्न राहुल नामक मुलाशी ठरविले होते. लग्नासाठी ५ लाखांचे दागिने तयार केले. साडे तीन लाखांची रोकड जमा केली. मात्र लग्नाची तयारी सुरू असतानाच होणाऱ्या जावयाचे आणि सासूचे सूत जुळले. १६ एप्रिल रोजी सासू आणि जावई फरार झाले. पळून जाण्याआधी सासूने स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी बनविलेले दागिने आणि रोकडही लंपास केली होती.
यानंतर पोलिसांनी राहुल आणि अनिता देवी यांच्या विरोधात कारवाईची सुरुवात केली असताना दोघेही अलिगढ पोलीस ठाण्यात शरण आले. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले. यानंतर गावातील पंचायत भरवली गेली, राहुलची समजूतही काढली गेली. मात्र दोघांनी एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे इतरांचा नाईलाज झाला.
आता १० महिन्यांनंतर पुन्हा एकदा अनिता देवी दुसऱ्या पुरूषाबरोबर फरार झाल्यामुळे या घटनेची उत्तरेत चर्चा होत आहे.

