Lok Sabha Women Reservation Bill: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाशी निगडीत तीन विधेयकांवर चर्चेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गुरुवारी लोकसभेत ती विधेयकं सादर केली. या विधेयकांना विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, एआयएमआयएम आणि बीजेडीसह अनेक विरोधी पक्षांनी या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध केला. या विधेयकावरून अखिलेश यादव आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यात सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला जोरदार विरोध केला. अखिलेश यादव यांनी महिला विधेयकाला समर्थन देताना मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. जनगणना का होत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “कारण सरकारकडे आम्ही जातीय जनगणनेची मागणी करु आणि पुन्ही जातीच्या आधारावर आरक्षणाची मागणी करु म्हणून सरकार जनगणना करत नाही. भाजपाला धोक्याने पुन्हा सत्तेत यायचंय”, असे अखिलेश यादव म्हणाले.
जातीय जनगणनेवरुन प्रश्न
अखिलेश यादव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणना करण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच, सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय घेतला असून, जातीय जनगणना होत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान, जनगणनेच्या प्रक्रियेत जातीचा कॉलमच नसल्याचे सपाचे खासदार धर्मेंद्र यादव म्हणाले. यावर बोलताना, “सध्या घरांची गणती सुरु असून, घरांना जात नसते. ज्यावेळी नागरिकांची गणती सुरु होईल, त्यावेळी जातीचा कॉलम वाढविण्यात येईल”, असे शाह यांनी स्पष्टे केले.
मुस्लिमांचे आरक्षण
धर्मेंद्र यादव यांनी यावेळी बोलताना मुस्लिम महिलांना आरक्षण देण्याबद्दल भाष्य केले. यावर अमित शाह यांनी म्हणाले की, “हे घटनाबाह्य आहे. आपले संविधान धर्माच्या आधारावर आरक्षणाला मान्यता देत नाही. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देणे घटनाबाह्य आहे,” असे शाह म्हणाले.
अखिलेश आणि शाह समोरासमोर
अमित शाह यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, गृहमंत्री शाह यांनी असंवैधानिक वक्तव्य केल्याचे अखिलेश यादव मत नोंदवले. मुस्लिम महिला लोकसंख्येच्या प्रमाणात अर्ध्या नाहीत का? असा सवाल यादव यांनी उपस्थित केला. यावर बोलताना, “समाजवादी पक्षाने आपली सर्व तिकिटे मुस्लिम महिलांना द्यावीत. आमचा काय आक्षेप आहे?”, असे खोचक प्रत्युत्तर शाह यांनी दिले.
