उदयपूर (राजस्थान) : काँग्रेसमधील वशिलेबाजीला आळा घालण्याचा महत्त्वाचा निर्णय पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आला असून आता निवडणुकीत मागेल त्याला उमेदवारी दिली जाणार नाही. उमेदवारी हवी असेल तर, पक्षात कार्यकर्त्यांनी-पदाधिकारी यांनी किमान पाच वर्षे सक्रिय राहण्याची अट घातली जाणार आहे.

सुंदर तलावांचे शहर असलेल्या उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबीर शुक्रवारी सुरू झाले असून पक्ष संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रणनीती ठरवणे आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे प्रमुख लक्ष्य ठेवून चिंतन शिबीर घेतले जात आहे.

आता ‘भाकरी फिरणार’

काँग्रेस पक्षात आता वर्षांनुवर्षे पदांवर राहता येणार नाही. एखाद्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त पाच वर्षे पदाची जबाबदारी सांभाळता येईल, त्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्याला पक्षात काम करावे लागेल. एक पद भूषवल्यानंतर किमान तीन वर्षे तरी संबंधित पदाधिकाऱ्याचा नव्या पदासाठी विचार केला जाणार नाही. हा प्रस्ताव संमत झाला तर काँग्रेस पक्षामध्येही भाकरी फिरवली जाईल. मात्र, पक्षाध्यक्षपदालाही हा  नियम लागू होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

पदांवर तरुणांना संधी

चिंतन शिबिरामध्ये सुमारे ४०० पदाधिकारी सहभागी झाले असून त्यामध्ये तरुण तसेच, ज्येष्ठांनाही सामावून घेण्यात आले आहे. मात्र, दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करताना पक्षामध्ये अधिकाधिक तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित केले पाहिजे या मुद्दय़ाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे पक्षातील विविध संघटनात्मक आघाडय़ांमध्ये किमान निम्मी पदे  ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होतकरू कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती पक्षनेते अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत दिली.   

कपिल सिबल, हार्दिक पटेल अनुपस्थित

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ‘जी-२३’ गटालाही समावून घेतले आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेती, युवक कल्याण आदी विषयांवर तीन दिवसांमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार असून यासंदर्भातील समित्यांमध्ये बंडखोरांचा समावेश केलेला आहे. सोनिया गांधींच्या भाषणापूर्वी पहिल्या रांगेत सोनिया आणि राहुल गांधी यांच्या शेजारी ‘जी-२३’ मधील गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांना स्थान देण्यात आले होते. मात्र आमंत्रण देऊनही बंडखोर गटातील नेते कपिल सिबल तसेच, गुजरातचे काँग्रेस नेते हार्दिक पटेल हे शिबिराच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहिले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.

‘पटेल, बोस, शास्त्री, आंबेडकर, भगतसिंह आमचेच’

सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, भगत सिंह अशा प्रतिभावान राष्ट्रपुरुषांवर काँग्रेसचा ‘हक्क’ असल्याचा संदेश ‘नवसंकल्प’ चिंतन शिबिरांच्या निमित्ताने भाजपला दिला आहे. भाजपप्रणित केंद्र सरकारच्या वतीने वर्षभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून अनेक स्वातंत्र्यसेनानींना भाजपच्या वतीने अभिवादन केले गेले. त्यांच्यावर भाजपने दाखवलेल्या ‘स्वामित्वा’ला आव्हान देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.

एक व्यक्ती एक तिकीट; अपवाद गांधी कुटुंब?

काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीची टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न केला असून एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला निवडणुकीची उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, कदाचित गांधी कुटुंबासाठी अपवाद केला जाऊ शकतो. सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही रायबरेली व वायनाड या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. गांधी कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अन्य पक्ष सदस्यांना मात्र नव्या नियमाचे पालन करावे लागेल.