China overwork death 32-year-old: जास्त वेळ काम केल्यामुळे ३२ वर्षीय चिनी प्रोग्रामरचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाओ गुआंगहुई (३२) असे या तरुणाचे नाव आहे. सतत काम आणि त्यामुळे येणाऱ्या अप्रत्यक्ष ताणातून गाओचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर काम आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलनावर चर्चा सुरू झाली आहे.

कामाचा प्रचंड ताण

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. गाओ गुआंगहुईला २०२१ मध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर तो टीम लीडर झाला होता. जबाबदारी वाढल्याने कामासाठी अतिरिक्त वेळ देणे त्याच्यासाठी सामान्य गोष्ट झाली होती. पण, गाओच्या पत्नीने तो कामाच्या ताणामुळे वेळेवर घरी येत नसल्याचे सांगितले. “मला शक्य झालं असतं तर त्याला यापूर्वीच नोकरी सोडायला लावली असती”, असेही गाओच्या पत्नीने वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले.

हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

गाओ सकाळी उठल्यानंतर त्याला त्रास होत होता. पण, घरुनच काम असल्याने त्याने काम करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळानंतर त्याला अधिक त्रास होऊ लागला व तो चक्कर येऊन कोसळला. कुटुंबीयांना त्याला लगेचच रुग्णालात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने गाओचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

मृत्यूनंतरही आला कामाचा संदेश

धक्कादायक बाब म्हणजे गाओचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्याच्या फोनवर कामाशी निगडीत संदेश आला होता. या संदेशात काम अत्यंत महत्वाचे आणि अर्जंट असल्याचेही नमूद करण्यात आले होते. यावरुन आता नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. चीनमध्ये कामगार कायदा कडक असला तरी त्याचे पालन होत नसल्याचा आरोप नेटकरी करतायेत. कामगार कायद्यानुसार कामगारांना दिवसाला आठ तासांहून अधिक वेळ काम करु नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कष्टाळू स्वभाव

गाओ कामासाठी गुआंगडोंग प्रांतातून हेनान प्रांतात शिफ्ट झाला होता. त्याच्याबरोबर त्याचे आई-वडील आणि पत्नीही होती. गाओ फार कष्टाने टीम लीडच्या पदापर्यंत पोहोचला होता. शिक्षण घेत असताना देखील तो पार्ट टाईम काम करत होता. शाळेतील मैत्रीणीबरोबरच त्याने लग्न केले होते. कामाच्या ताणामुळेच गाओचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे.

सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेवरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. “तो अखेरच्या क्षणापर्यंत काम करत होता हे फार वेदनादायी आहे. कोणतेही काम एवढे महत्वाचे नसते”, अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे. “जबाबदार व्यक्तीची कामातून सहज सुटका होत नाही”, असे मत दुसऱ्या एका व्यक्तीने मांडले आहे.