मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्यफेरीचा पहिला सामना सुरु आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आतापर्यंत नाणेफेकीचा कौल महत्वपूर्ण ठरला आहे. आज न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वर्ल्डकप २०१९ मध्ये इंग्लंडमधल्या या मैदानावर नाणेफेक जिंका, प्रथम फलंदाजी स्वीकारा आणि सामना जिंका असे सोपे गणित आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आतापर्यंत पाच सामने झाले असून पाचही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. १६ जूनला भारत-पाकिस्तान सामना याच मैदानावर झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेकीचा कौल जिंकला. पण त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नंतर सरफराजच्या या निर्णयावर बरीच टीका झाली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेटच्या मोबदल्या ३३६ धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्माने ११३ चेंडूत १४० धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्ताने हा सामना ८९ धावांनी गमावला. मंगळवारी नाणेफेक हरल्यानंतर विराट कोहलीने टॉस जिंकलो असतो तर मँचेस्टरच्या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी स्वीकारली असती हे कबूल केले. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने लगेच फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला.
भारताचा २७ जूनला वेस्ट इंडिज विरुद्ध सामना याच मैदानावर झाला. भारताने प्रथम फलंदाजी करतान २६८ धावा केल्या आणि हा सामना १२५ धावांनी जिंकला. इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात सुद्धा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला होता.