जोहान्सबर्ग :करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या भीतीपोटी दक्षिण आफ्रिकेतील देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी जगभरातील देशांना केले.

प्रवासविषयक निर्बंध टाळण्यासाठी विज्ञानविषयक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन डब्ल्यूएचओचे आफ्रिकेसाठीचे विभागीय संचालक मात्शिदिसो मोएती यांनी सर्व देशांना केले.

‘प्रवासविषयक निर्बंध करोना विषाणूचा फैलाव काहीसा कमी करण्यात भूमिका बजावू शकतात; मात्र त्यांच्यामुळे जीवन आणि उपजीविका यांवर फार मोठा बोझा पडतो’, असे त्यांनी एका निवेदनात सांगितले.

‘निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली, तर ते अनावश्य किंवा अनाहुत नसावे, तर आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियमावलीनुसार शास्त्रीय आधारावर असावेत’, अशी अपेक्षा मोएती यांनी व्यक्त केली.