कोव्हॅक्सिन लशीच्या जागतिक मान्यतेस लागणारा विलंब व कोव्हॅक्स सुविधेत लशींचा पुरवठा या मुद्द्यांवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसस यांनी आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांच्याशी चर्चा केली.

कोव्हॅक्सिन लशीला अजून जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही हा मुद्दा चर्चेत होता शिवाय कोव्हॅक्स लस पुरवठा योजनेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीकडून अ‍ॅस्ट्राझेनेका म्हणजे कोव्हिशिल्ड लशीचा पुरवठा होत नसल्याबाबत घेब्रेससस यांनी दूरध्वनीवर मंडाविया यांच्याशी चर्चा केली. घेब्रेसस यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे की, भारताचे आरोग्य मंत्री मंडाविया यांच्याशी करोना लसीकरण कार्यक्रमाबाबत चर्चा केली त्याशिवाय डिजिटल आरोग्य, पारंपरिक औषधे, जागतिक सहकार्य यावरही चर्चा झाली. सीरमकडून अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस मिळण्याच्या मुद्द्यावर मंडाविया यांना प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन या भारत बायोटेकच्या लशीला आपत्कालीन मान्यता मिळण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली असून सी टॅप मार्फत परवाना व तंत्रज्ञान हस्तांतरणाचा मुद्दाही त्यात होता.

कोविड १९ टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सेस पूल सी टॅप ही योजना गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू झाली असून आरोग्य उत्पादनांचे उत्पादन वाढवून त्याचा सर्वांना समान व किफायतशीर दरात पुरवठा करण्याचा उद्देश यात आहे.

 भारतात मंगळवारपर्यंत ९९ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. भारतातील प्रौढ लोकसंख्येमधील ७४.४५ टक्के लोकांना लशीची पहिली मात्रा देऊन झाली आहे. ३०.६३ टक्के लोकांना दोन्ही मात्रा देऊन झाल्या आहेत.