World Leaders Praise PM Modi for Longest Serving Prime Minister: एनडीए सरकारने १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदी राहण्याच्या कार्यकाळाला मागे टाकले आहे. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर जगभरातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. जागतिक नेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१४ पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर २०२४ साली सलग तिसऱ्यांदा ते या पदावर आरूढ झाले. तब्बल ४,३९९ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान नेहरू ४,३९८ दिवस पंतप्रधानपदावर होते.
या विशेष प्रसंगी जगातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल पोस्ट लिहिल्या आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती, जगभरात भारताचा वाढणारा दबदबा, विकासात घेतलेली झेप याबद्दल अनेकजण बोलत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत एक बलशाली देश म्हणून पुढे आल्याचेही अनेकांनी म्हटले.

अमेरिकेतील खासदारांकडून कौतुक
टेक्सासमधील रिपब्लिकन पक्षाचे खासदार जॉन कार्निन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषविल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. लोकशाहीमध्ये तीन वेळा जनादेश मिळवून त्यांनी तब्बल ४,३९९ दिवस हे पद भूषविण्याचा विक्रम केला आहे. २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढत त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक बदल झाले. तसेच भारत आणि अमेरिकेचे संबंधही बळकट झाले.
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनीही पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. “निवडून आलेले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेल्या पंतप्रधान मोदींचे अभिनंदन. अनेक दशकांची मेहनत, समर्पण आणि सशक्त नेतृत्वामुळे हे यश त्यांना लाभले आहे”, असे सर्जियो गोर म्हणाले.
गायिका मेरी मिलबन काय म्हणाल्या?
अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका मेरी मिलबन यांनीही सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मिलबन म्हणाल्या की, भारताचा तिरंगा अवकाशात अभिमानाने फडकत आहे. आपण एका ऐतिहासिक आणि लोकशाही टप्प्याचा उत्सव साजरा करत आहोत. आपल्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या महत्त्वाकांक्षांना एक नवा पैलू दिला आहे.
मेरी मिलबन यांनी पंतप्रधान मोदींच्या जीवन प्रवासाला ‘इंडियन ड्रीम’चे सच्चे उदाहरण म्हटले. गुजरातच्या भूमीतून पुढे येत मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान पदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यांचा हा प्रवास दृढनिश्चय, धैर्याचे प्रतीक आहे, असे त्या म्हणाल्या.
#WATCH | Washington DC, USA: Prominent Hollywood singer and actress Mary Millben extends her heartfelt congratulations to Prime Minister Narendra Modi on becoming India's longest-serving democratically elected Prime Minister.
— ANI (@ANI) June 9, 2026
In her video message tweeted on X, she says, "As the… pic.twitter.com/eD2bAEWnCR
मेरी मिलबन पुढे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अमेरिका आणि भारताचे संबंध सुधारले याकडेही मिलबन यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकाळात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांबरोबर काम केले. काही राष्ट्राध्यक्षांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, तर काहींबद्दल आदर होता. पंतप्रधान मोदींनी आपल्या देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवत परराष्ट्र धोरण आखले आणि इतर देशांशीही सलोखा वाढवला.”
श्रीलंकचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायका यांनीही पत्र पाठवून पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीची प्रशंसा केली. “हा केवळ तुमच्या कार्यकाळाचा गौरव नाही तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाने तुमच्या नेतृत्वावर टाकलेल्या विश्वासाचाही गौरव आहे”, असे गौरवोद्गार दिसानायका म्हणाले. भारताच्या परराष्ट्र धोरणात श्रीलंकेचे विशेष स्थान आहे. पंतप्रधान मोदींनी आजवर चार वेळा श्रीलंकेचा दौरा केला आहे. श्रीलंकेवर २०२२ साली आलेल्या आर्थिक संकटातही भारताने त्यांची मदत केली होती. याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
पॅसिफिकमधून पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी व्हिडीओ प्रसारित करत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. एक आदर्श नेतृत्वाचे उदाहरण म्हणून पंतप्रधान मोदींकडे पाहता येईल, असे ते म्हणाले. २० कोटी भारतीय नागरिकांना पंतप्रधान मोदींनी गरिबीतून बाहेर काढले. मे २०२३ साली पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीला भेट दिली होती. हा दौरा करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान होते.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया काय?
पंतप्रधान पदावर राहण्याचा ४,३९९ दिवसांचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्टद्वारे संदेश दिला आहे. “जनसेवा हीच सुशासनाची सर्वात मोठी कसोटी आहे. विनम्रता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा यासह निरंतर कार्यरत असणारा व्यक्तीच जनतेचा विश्वास प्राप्त करतो”, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
