Girish Kuber’s expert take on World War 3 symptoms : इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात युद्ध छेडलं असून आजचा हल्ल्यांचा १६ वा दिवस आहे. गेल्या १६ दिवसांत इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तरित्या इराणवर आक्रमक हल्ले केले. परिणामी इराणनेही प्रत्युत्तरादाखल आखाती देशांना लक्ष्य केलं. यामुळे जगभरात इंधनकोंडी निर्माण झाली असून हे युद्ध कधी संपणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. दरम्यान, या युद्धाची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने जगात तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झालीय. याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लोकसत्ता मुक्तसंवादमध्ये चर्चा केली आहे.
तिसरं महायुद्ध होणार का?
इस्रायल आणि अमेरिकेने पुकारलेल्या युद्धाचं रुपांतर तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संपादक गिरीश कुबेर म्हणाले, “तिसरं महायुद्ध होईल, असं वाटत नाही. कारण, या युद्धात इतर देशांना रस नाहीय. घरातील चूल कशी पेटणार हाच सर्वांसमोर प्रश्न आहे. अमेरिकन वर्तमानपत्र रोज पाहिली तर तुम्हाला जाणवेल की अमेरिकेतून या युद्धाला शून्य पाठिंबा आहे. महायुद्धात स्वतःच्या देशातून तरी पाठिंबा हवा ना. पण तसं अजिबात वाटत नाहीय. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता नाही.”
एलपीजीबाबत वास्तव काय समजायचं?
पेट्रोलिअम मंत्री हरदीप पुरी सांगतात की देशात पुरेशा प्रमाणात गॅस उपलब्ध आहे. परंतु, गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रस्त्यावर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही परिस्थितीत वास्तव नेमकं काय आहे? या प्रश्नावर संपादक गिरीश कुबेर म्हणाले, “हरदीपसिंग पुरी सांगतात ते आणि रस्त्यावर लागणाऱ्या रांगा यांच्यामध्ये वास्तव आहे. हरदीपसिंग पुरी सांगतात ते खरं आहे. पण रस्त्यावरच्या रांगाही खऱ्याच आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर १० -१२ दिवसांनी कंपन्यांना तेलापेक्षा गॅसला महत्त्व देण्यास सांगितलं. तिथे आपला अंदाज चुकला, हे निश्चित आहे.”
“३१ बिलिअन्स मेट्रिक टन्स गॅस आपण आयात करतो. त्यातील ६० टक्के गॅस पश्चिम आशियातून येतो. गॅस अमर्याद आहेत, अशा कल्पना करून वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या. उज्वला योजना यायच्या आधी देशामध्ये साडेचौदा कोटी घरांमध्ये गॅस होता, उज्ज्वला योजनेमुळे ३५ कोटी घरांमध्ये गॅस गेला. गॅस अमर्याद असेल तर ही योजना चांगली आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही योजना चांगलीच आहे. पण गॅसला तुडवटा होईल असं वाटलं नव्हतं. पण तिथे आपण फसलेलो आहोत”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
