World Youngest Male Professor Nathan Thomas : प्राध्यापक बनण्याचं असं कोणतं ठराविक वय नसतं. परंतु, प्राध्यापक होण्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता मिळवण्यात बरेच वर्षे खर्ची होतात. त्यामुळे वयाच्या विशीनंतर एखादा व्यक्ती प्राध्यापक म्हणून कार्यरत होऊ शकतो. पण जगातील सर्वांत तरुण प्राध्यापक हा केवळ १८ वर्षे ३४६ दिवसांचा आहे. फ्लोरिडातील नॅथन थॉमस असं त्याचं नाव असून अध्यापन क्षेत्रात पाऊल ठेवत तो जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक बनला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या थॉमसने ३०० वर्षांहून अधिक काळ न तुटलेला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’चा विक्रम मोडीत काढला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, थॉमसला ऑगस्ट २०२३ मध्ये मियामी डेड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. तेथे त्याने ‘COP 2270: C फॉर इंजिनीअर्स’ हा कोर्स विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे अनेक विद्यार्थी त्याच्याच वयाचे होते.

३०६ वर्षांचा विक्रम मोडला

थॉमसने स्कॉटिश गणितज्ञ कॉलिन मॅक्लॉरिन यांचा पूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे, जे १८ व्या शतकाच्या सुरुवातीला वयाच्या १९ व्या वर्षी प्राध्यापक झाले होते. हा विक्रम ३०६ वर्षे अबाधित होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सांगितलं की, २००८ मध्ये आलिया सबूर या सर्वांत तरुण महिला प्राध्यापक ठरल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय १८ वर्षए ३६२ दिवस होते. यांच्यापेक्षाही थॉमस हा १६ दिवसांनी लहान आहे. त्यामुळे तो आता जगातील सर्वांत तरुण प्राध्यापक ठरला आहे.

“एकदा तुम्ही त्या वातावरणात गेलात की, प्रत्येक जण तिथे एकाच कारणासाठी आलेला असतो आणि ते कारण म्हणजे शिकणे. वयाचा तिथे काहीही फरक पडत नाही”, असं थॉमसने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सशी बोलताना सांगितलं. तो पुढे म्हणाला, “माझं संपूर्ण लक्ष माझं काम चांगल्या प्रकारे करणं आणि विद्यार्थ्यांना शक्य त्या सर्व मार्गांनी मदत करणं यावरच असतं. जर कोणी मेहनत घेण्यास तयार असेल, तर माझ्यासाठी तीच गोष्ट सर्वात महत्त्वाची असते.”

एक इंजिनीअरिंगचा शिक्षक म्हणून थॉमस विद्यार्थ्यांना कॉम्प्युटिंग आणि प्रोग्रामिंगच्या कठीण संकल्पना शिकवतो. त्याच्या या यशाचं त्याच्या सहकाऱ्यांनीही कौतुक केलं आहे. मियामी डेड कॉलेजच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी अँड डिझाईनचे डीन मॅनी पेरेझ यांनी ‘द रिपोर्टर’शी बोलताना सांगितलं, “नॅथन आमच्या कर्मचारी वर्गाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला नॅथनसारख्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळते, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की ही एक खास व्यक्ती आहे. अशी व्यक्ती जी आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरू शकते.”

वयाच्या दहाव्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश

थॉमसचा शैक्षणिक प्रवास खूप लवकर सुरू झाला होता. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी त्याने मियामी डेड कॉलेजमध्ये ड्युअल-एनरोलमेंट (दुहेरी प्रवेश) घेतली होती आणि त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी त्याने फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला. पुढील चार वर्षांत त्याने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर आणि मास्टर डिग्री दोन्ही पदव्या सन्मानासह (Honours) पूर्ण केल्या. इंजिनीअर्सच्या कुटुंबातून येत असल्यामुळे, थॉमसने सांगितलं की त्याची स्टेम (STEM – सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथ्स) मधील आवड अगदी नैसर्गिकरित्या निर्माण झाली.

गणिताबद्दलची आवड निर्माण करण्याचं श्रेय त्याने आपल्या आईला दिलं, कारण ती कठीण संकल्पना सोप्या करून सांगायची. सध्या २१ वर्षांचा असलेला थॉमस ऑनलाईन शिकवत आहे आणि त्याचसोबत युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ लॉ मधून ‘ज्युरीस डॉक्टर’ पदवीचं शिक्षण घेत आहे.