Worlds Largest Shivling Stuck in Bihar : बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यात जगातील सर्वांत मोठा, विशालकाय शिवलिंग घेऊन जाणारा ट्रेलर गेल्या तीन ते चार दिवसांपासून चेकपोस्टवर थांबवण्यात आला आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईहून दीड महिन्यांपूर्वी हे शिवलिंग एका ट्रेलरवरून चंपारण जिल्ह्यातील केसरिया येथील विराट रामायण मंदिरात घेऊन जाणार आहे. तेथेच या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

शिवलिंगाचा पाच राज्ये अन् २१०० किमी प्रवास

ग्रॅनाइटच्या एकाच सलग दगडात कोरलेले आणि अंदाजे २१० मेट्रिक टन वजनाचे शिवलिंग बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील विराट रामायण मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. या मंदिराचे काम निर्माणाधीन आहे. तामिळनाडूच्या चेन्नईहून नोव्हेंबर महिन्यात बिहारला जाण्यासाठी निघाले. हे शिवलिंग पाच राज्यांमधून २१०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणार आहे. मार्गात येणाऱ्या शहरांतील नागरिकांनी रस्त्यावरच रांगा लावल्या होत्या. हे रस्तेच भक्तीभावाने फुलून गेले होते. या प्रवासाला एक अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नदीवरील पुलाची वाहक क्षमता कमी

जानेवारीच्या सुरुवातीलाच हा प्रवास उत्तर बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यात पोहोचला. येथेही भक्तांनी एकच जल्लोष केला. हर हर महादेवच्या जयघोषाने रस्ते दुमदुमूनगेले. पूर्व चंपारण जिल्हा गोपाळगंजपासून १५० ते २०० किमी आहे. या मार्गावरील नारायणी नदी ओलांडणे मोठे कठीण काम आहे. कारण, या नदीवरील पुलाची भार वाहक क्षमता कमी आहे. अभियंत्यांनी पुलाच्या संरचनात्मक अखंडतेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर गोपाळगंजचे डीएम पवन कुमार सिन्हा आणि पोलीस अधीक्षक अवधेश दीक्षित यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. सुरुवातीच्या मूल्यांकनात पुलावर अनेक भेगा आढळल्या. यामुळे शिवलिंग आणि मल्टि एक्सल ट्रान्सपोर्ट व्हेइकलचे एकत्रित वजन हा पूल सहन करू शकेल का याबाबत शंका उपस्थित झाली आहे.

सुरक्षिततेची खात्री केल्यावर कोणत्याही हालचाली होणार नाहीत

बिहार राज्य पुल निर्माण निगम लिमिटेड (BRPNNL), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पथकांना तपशीलवार भारनियमन अभ्यास करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. सुरक्षिततेची पूर्णपणे खात्री केल्याशिवाय कोणत्याही हालचालींना परवानगी दिली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

पर्यायी मार्गांचा विचार?

दरम्यान, पर्यायी मार्गांचाही विचार केला जात आहे. पण प्रत्येक मार्गावर पूल आहेत, ज्यावरून शिवलिंग तांत्रिकदृष्ट्या घेऊन जाणे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे सध्या गोपाळगंजमधील बालाथरी चेकपोस्टजवळ शिवलिंग स्थिर आहे. इथे भाविक मोठ्या संख्येने जमत आहेत. हा जमाव टाळण्यासाठी आणि पार्क केलेल्या ताफ्याभोवतीचे रस्ते मोकळे ठेवण्यासाठी गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनाचे प्रयत्न केले जात आहेत.