नवी दिल्ली : ऑस्ट्रियामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अंशत: राष्ट््ररीय टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून युरोपमधील अन्य देशांनी त्यापेक्षा तुलनेत सौम्य म्हणजेच लस न घेतलेल्या व्यक्तींना मद्यालये-उपाहारगृहांमध्ये मनाई आदी निर्बंध जारी केले आहेत. या निर्बंधांना विरोध करण्यासाठी युरोप आणि ऑस्ट्रियातील हजारो नागरिक शनिवारी रस्त्यावर उतरले होते.

करोनाच्या नव्या लाटेचे संकट उद्भवू नये या दृष्टीने अनेक देशांनी नुकतेच करोना प्रतिबंधक उपाययोजना कठोर केल्या आहेत. ऑस्ट्रियाने शुक्रवारी घेतलेला अंशत: टाळेबंदीचा निर्णय हा पश्चिम युरोपात अलीकडे घेण्यात आलेला सर्वाधिक लक्षणीय निर्णय म्हणावा लागेल.

नेदरलँडमध्ये करोना निर्बंधांविरोधात गेले दोन दिवस निदर्शने झाली. रात्री निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच पेटते फटाके फेकले. त्यांनी दोन दुचाकीही जाळल्या. त्याच्या आदल्या दिवशी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान दोन निदर्शक जखमी झाले होते. रोटरडॅम शहरात करोना निर्बंधांविरोधात निदर्शने करणाऱ्या ५१ जणांना अटक करण्यात आले होते. हेग येथे पोलिसांनी एका निदर्शकाला अटक केली होती. क्रोशियातील झाग्रेब येथे नागरिकांनी लसीकरण आणि करोना निर्बंधांविरोधात मोर्चा काढला. अ‍ॅमस्टरडम येथे शनिवारी हजारो संतप्त नागरिकांनी अलीकडे लागू केलेल्या करोना निर्बंधांचा निषेध केला. अन्य एका गटाने आदल्या रात्री झालेला हिंसाचार लक्षात घेता आपली नियोजित निदर्शने रद्द केली.

बेल्जियमच्या सीमेजवळ दक्षिणेकडील ब्रेडा शहरात सध्या लागू केलेल्या करोना निर्बंधांविरोधात तेथील संगीत पथकांनी संगीतमय निदर्शने केली. या शहरात सध्या निर्बंधांमुळे मद्यालये आणि उपाहारगृहे रात्री आठ वाजताच बंद केली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. नेदरलँडमध्ये शनिवारपासून तीन आठवडय़ांची टाळेबंदी लागू झाली आहे. लसीकरण न झालेल्या लोकांना काही ठिकाणी प्रवेशबंदी करण्याबाबत तेथे विचार सुरू आहे.

लसीकरण अनिवार्य करण्यास विरोध

’ ऑस्ट्रिया- शनिवारी व्हिएन्नत ३५ हजार लोकांचा मोर्चा. यात बहुतांश उजव्या गटांचा समावेश, जसे फार राइट फ्रीडम पार्टी, अ‍ॅन्टिव्हॅसिन एमएफजी पार्टी.

’ उत्तर आर्यलड- बेलफास्टमधील नगर सभागृहापुढे हजारो लोकांची लस पारपत्राविरोधात निदर्शने. देशात १३ डिसेंबरपासून नाइट क्लब, बार, उपाहारगृहांत प्रवेशासाठी लस प्रमाणपत्राची सक्ती होणार आहे. अनेक निदर्शकांनी करोना निर्बंधांची तुलना नाझी अत्याचारांशी केली.

’ इटली- बस, रेल्वे प्रवास, सिनेमा, उपाहारगृहांत प्रवेशासाठी लस प्रमाणपत्राच्या सक्तीविरुद्ध तीन हजार लोकांची निदर्शने.

’ ऑस्ट्रेलिया- विशिष्ट व्यवसायातील लोकांना लसीकरण सक्तीचे केल्याच्या निषेधार्थ दहा हजार लोकांचा सिडनीमध्ये मोर्चा.

’ डेन्मार्क- सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी कोविड पासची सक्ती करण्याच्या प्रस्तावाविरुद्ध डेन्मार्कमध्ये एक हजार लोकांची निदर्शने.

’  फ्रेंच वसाहत असलेल्या ग्युआडेलोपमध्ये  हिंसक आंदोलन झाल्याने फ्रान्स सरकारने तेथे सुरक्षा दले पाठविली.