देशाचा महसुली तोटा फेब्रुवारी २०१९ च्या अखेरीपर्यंत संपूर्ण वर्षांच्या अर्थसंकल्पीय अनुमानाच्या १३४.२ टक्केंवर पोहोचला आहे. याप्रकरणी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार वृद्धी कमी राहिल्याने महसुली तोटा वाढला आहे. लेखा महानियंत्रकांच्या (सीजीए) आकडेवारीनुसार एप्रिल-फेब्रुवारी २०१८-१९ मध्ये महसुली तोटा ८.५१ लाख कोटी रूपये राहिला. दरम्यान, सरकार महसुली तोट्याला सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.४ टक्क्यांपर्यंत रोखण्यास प्रतिबद्ध असल्याचे आर्थिक प्रकरणांचे सचिव एस सी गर्ग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

आकडेवारीनुसार केंद्र सरकारची महसुली कमाई ही १२.६५ लाख कोटी होती. जी संशोधित अंदाजपत्रकाच्या ७३.२ टक्के आहे. यापूर्वी मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधी महसूल अंदाज ७८.२ टक्के होता. सरकारचे कर उत्पन्न १०.९४ लाख कोटी रुपये आणि बिगर कर महसूल १.७ लाख कोटी रुपये राहिला. एप्रिल-फेब्रुवारी, २०१८-१९ या कालावधीत सरकारचा एकूण खर्च २१.८८ लाख कोटी रुपये (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ८९.०८ टक्के) राहिला.

यामध्ये १९.१५ लाख कोटी रुपये महसूल तर २.७३ लाख कोटी रुपये जमा खात्याचे होते. यादरम्यान अर्थ मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करून फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारने राज्यांना करामध्ये त्यांच्या हिश्श्याअंतर्गत ५.९६ लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. हे २०१७-१८ च्या समान कालावाधीपेक्षा ६७.०४३ कोटी रुपये जास्त आहेत.

दुसरीकडे देशाच्या परकीय चलन साठ्यात सलग तिसऱ्या आठवड्यात तेजी दिसून आली. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार परकीय चलन साठा २२ मार्च रोजी संपलेल्या आठवड़यामध्ये १.०२ अब्ज डॉलर वाढून ४०६.६६ अब्ज डॉलर झाले आहे.